भाजपाकडून रोज अपमान होतो आहे तरीही शिवसेना भाजपासोबतच आहे अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत केली. शिवसेना पुण्यात आहे का हो? असाही खोचक प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर असं वागण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती असंही ते म्हणाले. युती होण्यापूर्वीची जरा भाषणं आठवून बघा. ही युती पंचवीस वर्षे सडली असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग ही युती १२४ वर का अडली? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.

पुण्यात भाजपाने शिवसेनेला शिल्लकही ठेवलं नाही. नाशिक, पुणे यांसारख्या शहरात शिवसेनेला एक जागा मिळत नाही? कुठून येते एवढी हतबलता? असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. जर बाळासाहेब ठाकरे असते तर असं वागण्याची हिंमत भाजपाची झाली नसती असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारने देशभरात स्मार्टसिटी तयार करण्याची एक घोषणा केली होती. त्या घोषणेचं काय झालं? पुणे शहरात जे काही पाणी भरलं, वाहतूक कोंडी होते आहे, खड्डे पडलेले रस्ते आहेत. हे सगळं म्हणजे स्मार्ट सिटी का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. बहुमताचं सरकार आल्याने हे सरकार कोणतेही निर्णय घेतं आहे. निर्णय घेताना कुणालाही जुमानलं जात नाही त्यामुळे त्यांना जाब विचारणारा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडा असंही आवाहन राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केलं.

पुण्यातल्या भाषणात जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेचा उल्लेख केला तेव्हा उपस्थितांनी ‘लाचार सेना’ अशीही घोषणाबाजी केली. त्या घोषणेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले पुण्यात शिवसेना आहे का हो? हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.