महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ तारखेपासून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यातील सभेमधून करणार आहे. मात्र राज यांच्यासभेसाठी पुण्यामध्ये मैदान उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणारी मनसे थेट रस्त्यावरच सभा घेण्याच्या तयारीत आहे. टिळक रोडवरील अलका चौकात भररस्त्यावर सभा घेण्याचा निर्धार मनसेने केला आहे. मात्र नियमांनुसार भररस्त्यावर किंवा चौकात सभा घेता येत नाही. त्यामुळेच आता मनसे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मनसेने कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार मैदानात किशोर शिंदे यांना उतरवले आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. अशातच राज यांची सभा पुण्यात होणार असल्याचे त्याचा पक्षाच्या उमेदावारांना फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सभेसाठी मनसेने सरस्वती शाळा, न्यू इंग्लिश रमणबाग शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळांकडे मैदानाची मागणी केली होती. मात्र या सर्व शाळांनी मनसेला मैदान देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे ‘पुणे शहरातील अनेक संस्था या सत्ताधारी भाजपाशी संबंधित असल्याने आम्हाला सभेसाठी जागा उपलब्ध होत नाही. हा दडपशाहीचा प्रकार आहे,’ असा आरोप मनसे शहराध्यक्ष आणि कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अजय शिंदे यांनी केला आहे. मैदान न मिळाल्यास अलका चौकात भररस्त्यात सभा घेऊ असा आक्रामक पवित्रा मनसेने घेतला आहे. त्यामुळे खरोखरच राज आता रस्त्यावर सभा घेणार की मनसेला पुढील दोन दिवसात पुण्यात सभेसाठी जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रत्यक्ष निवडणुकींमध्ये न लढता राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये त्यांनी डिजीटल माध्यमांची आणि प्रेझंटेशनची मदत घेत सभा घेऊन सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली होती. मात्र राज यांच्या या भाजपाविरोधी प्रचाराचा फारसा फरक पडल्याचे निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसले नाही. त्यामुळे यंदा विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार की मनसे फॅक्टर या निवडणुकीमध्ये कमाल करणार याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहेत.