महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी डोंबिवलीमध्ये सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या सभेमध्ये राज यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या धोरणांवर टीका केली. त्याचप्रमाणे त्यांनी युती सरकारच्या आधीचे सरकार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीकास्त्र सोडले. राज यांनी पृथ्वीराज यांची तुलना सत्तरच्या दशकामध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या एका दाक्षिणात्य अभिनेत्याशी केली.

परप्रांतिय मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येत असल्याचा मुद्दा राज यांनी आपल्या भाषणामध्ये मांडला. ‘परराज्यातून मुंबईत येणारा सर्वाधिक लोंढा हा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ येथे मोठ्या संख्येने परराज्यातून लोक येतात,’ असं राज म्हणाले. याच मुद्द्यावरुन त्यांनी राज्यामध्ये २०१४ आधी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारपासून आताच्या युती सरकारवरही टीका केली. ‘मी खूप आधीपासून परप्रांतियांचा मुद्दा मांडत आहे. आधीच्या काँग्रेस सरकारने याबद्दल काही भूमिका घेतली नाही. आधीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर सत्तरच्या दशकामधील एका दाक्षिणात्य अभिनेत्यासारखे दिसतात,’ असा टोला राज यांनी लगावला. पाहा काय म्हणाले राज…

या सभेमध्ये राज ठाकरेंनी डोंबिवली शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेच्या आमदाराला निवडून द्या असं आवाहनही केलं.