मनसेला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून असं आवाहन राज ठाकरे यांनी भांडुप इथल्या सभेत पुन्हा एकदा केलं. मात्र त्याचवेळी विविध मुद्द्यांवरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकरी आत्महत्येचा मुद्दा राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अधोरेखीत केला. आपल्या राज्यात गेल्या पाच वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र या सरकारला त्यांची पर्वा नाही अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली. एवढंच नाही तर आज अमित शाह हे जेव्हा भाषण करत होते तेव्हा शेजारच्या गावात एक शेतकरी आत्महत्या करत होता. अमित शाह कलम ३७० बाबत बोलत होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम ३७० चा विषय का आणता आहात? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

मनसेला एक सक्षम आणि कणखर विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. म्हणजे शेतकऱ्यांवर, सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाचा आम्ही जाब सरकारला विचारु. तुम्हाला वाटत असेल की मी इतके दिवस एक हाती सत्ता मागत होतो आता सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या अशी मागणी करतो आहे. मात्र एकहाती सत्ता द्या ही माझी मागणी आहेच. सध्या माझा आवाका नाही हे मी ओळखलं आहे त्यामुळे माझा पक्ष हा पहिला पक्ष आहे जो उघडपणे सांगतो आहे की होय आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असंही राज ठाकरेंनी भांडुप येथील सभेत सांगितलं.

भाजपा शिवसेना सरकारने महाराष्ट्राची अवस्था हतबल अशी करुन टाकली आहे. माझा महाराष्ट्र असा कधीही नव्हता. अटकेपार झेंडा फडकवणारा महाराष्ट्र गलितगात्र कसा काय पडला आहे? महाराष्ट्राला याबाबत चीड येत नाही का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.