महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये सोमवारी रात्री प्रचारसभा घेतली. यासभेमध्ये त्यांनी अनेक विषयांना हात घातला. भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील, सरकारने दिलेली आश्वासने याबरोबरच त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर बोलताना मराठी लोकांनाच मराठी भाषेचा अभिमान वाटत नाही अशी खंत व्यक्त केली. स्वत:च्या मातृभाषेवर आणि राज्यावर असणाऱ्या प्रेमाचे उदाहरण देताना त्यांनी काँग्रसेचे दिवंगत नेते विलासराव देखमुख मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा आपल्या भाषणात सांगितला.

‘विलासराव मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये बीएमडब्ल्यू ही परदेशी वाहन कंपनी मोठी गुंतवणूक करुन कारखाना उभारणार होती’ असं सांगात राज यांनी हा किस्सा सांगायला सुरुवात केली. ‘महाराष्ट्रात त्याच वेळी मर्सिडिज या कंपनीने आपला कारखाना सुरु केली होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बीएमडब्ल्यूचा हा कारखाना राज्यात सुरु करायचा होता मात्र दुर्देवाने तसं झालं नाही. बीएमडब्ल्यूच्या कारखान्यासंदर्भातील कामाची जबाबदारी विलासरावांनी एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याला दिली. त्यानंतर बीएमडब्ल्यू कंपनीचे काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्याची भेट घेतली. मात्र या अधिकाऱ्याने कंपनीने कारखाना स्थापन करण्यासाठी केलेल्या आवश्यक गोष्टींची मागणी फेटाळली आणि त्या गोष्टी पुरवण्यास नकार दिला. या अधिकाऱ्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर एकही मागणी पूर्ण होऊ शकत नाही असं बैठकीमध्ये सांगितलं. त्या कंपनीचे अधिकारी निघून गेल्यानंतर या दाक्षिणात्य अधिकाऱ्याने त्याच्याच बॅचमधील एका अधिकाऱ्याला फोन केला. तामिळनाडूत कार्यरत असणाऱ्या या दुसऱ्या अधिकाऱ्याला महाराष्ट्र सरकारमधील अधिकाऱ्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मी आता बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना कारखान्यासाठी नकार दिला आहे. तू त्यांना लगेच फोन करुन तो कारखाना तुमच्याकडे घे असं सांगितलं. याला म्हणतात आपल्या राज्यावरील प्रेम,’ असं राज ठाकरेंनी भाषणात सांगितलं.

दरम्यान, या भाषणामध्ये राज यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ‘या निवडणुकीत आमचा अजय ‘चंपा’ ची चंपी करणार. कोल्हापूर सांगली या दोन शहरांमध्ये पूर आला आणि सरकारमधला मंत्री वाहून कोथरुडमध्ये आला’ असा टोला राज यांनी लगावला. ‘चंपा’ हे नाव पुणेकरांनी चंद्रकांत पाटील यांनी ठेवलं हे कळल्यावर पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत आहेत, अशी मिष्कील टीका राज यांनी केली.