महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी डोंबिवलीमध्ये सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या सभेमध्ये राज यांनी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. अनेक विषयांच्या प्रश्नांसाठी आपल्याकडे लोक येतात मात्र प्रत्येक वेळेस आमची खळ् खट्याक भूमिका नसते असं राज यांनी सांगितलं. ‘सकाळी उठल्यावर आज कोणाच्या कानफाटीत मारायची असा विचार नसतो तो. निवेदने देऊनही काम झाली नाही अन् कानफाटात मारुन होत असतील तर काय करायचं?,’ असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑप्रेटीव्ह बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून या बँकेतील खातेदार बँकेच्या वेगवेगळ्या शाखांसमोर आंदोलने करत आहे. याच आंदोलनाच्या संदर्भ देत राज यांनी ‘मनसेची कायम खळ् खट्याक भूमिका नसते असं स्पष्ट करताना निवेदनाने काम झालं नाही तर काय करायचं?,’ असा सवाल उपस्थित केला. ‘काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेमध्ये पैसे अडकलेल्या काही माता-भगिनी मला भेटायला आल्या होत्या. त्यापैकी एकीचा नवरा रुग्णालयात दाखल होता, एका घरी लग्न होतं. आमचा दोष काय असं हे खातेदार मला विचारत होते. खरचं आहे त्यांच बँक अचानक एक दिवस फोन करते आणि उद्यापासून व्यवहार बंद असं सांगते आणि आपली लोकं काय करतात समोर रडत बसतात. या बँकेच्या संचालकांसारख्या लोकांना जोपर्यंत भिती नसेल ना तोपर्यंत काही होणार नाही. मला अनेकजण विचारतात तुमच्या खळ् खट्याकबद्दल. पण निवेदनाची भाषा समजत नसेल आणि कानफाटात मारल्यावर काम होत असेल तर नक्की काय करायलं हवं मला कळू द्या,’ असं राज म्हणाले.

सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या धोरणांवर टीका केली. अनेक वर्ष येथील आमदार सत्तेत असून मंत्री होऊन रस्त्याची अशी अवस्था असेल तर शहर व्यवस्थापनाबद्दल काय बोलणार अशी खंतही राज यांनी आपल्या भाषणामधून मांडली.