राज ठाकरे यांचा वैजापूर सभेत सवाल

महाराष्ट्राची निराशा होते, कारण तुम्ही थंड आहात. जे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होते, तेच भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार? डोक्यावर तेच बसणार, बदल काय होईल, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपकडून ३७० कलम रद्द करण्याच्या प्रचाराचा समाचार घेतला. वैजापूर येथे मनसे उमेदवार संतोष जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

जो जन्म आपल्याला मिळाला आहे, तो कुटुंबावर खर्च करण्याऐवजी एक तरुण भाजपचा टी-शर्ट घालून आत्महत्या करतो, आयुष्य संपवतो. त्याचे आयुष्य सरकारमध्ये बसलेल्या नादान लोकांमुळे संपते आहे.  ज्यांच्यामुळे आयुष्य संपते आहे, आता त्यांनाच संपवा, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी शेतीच्या भावमालाचा प्रश्नही त्यांनी हाताळला. पिकाला भाव मागता, पण तुम्हाला भाव कुठे आहे? या पक्षातली माणसे त्या पक्षात जातात. निवडणुकीच्या काळात तुम्ही हसता, टाळ्या वाजवता. त्यांच्याच नावे बटण दाबून मोकळे होता. मग पुन्हा पाच वर्षे आपण रडायला मोकळे. देशभरात मंदीची लाट आहे. अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहे. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा येतात आणि ३७० कलम काढून टाकले, असे सांगतात. कलम काढले, त्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला विचारतो, कधी काश्मीर पाहिले आहे काय? आपण फक्त फ्रीजमधला बर्फ पाहतो.

आम्हीपण देशभक्त आहोत. तेवढेच माझे माझ्या महाराष्ट्रावरही प्रेम आहे. या राज्यातला तरुण व शेतकरी हतबल आहे. अजूनही कोस-कोस जाऊन पाणी आणावे लागते. मला विरोधी पक्षात बसायचे आहे. कारण जाब विचारता आला पाहिजे. एकदा दार उघडा. तुमच्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. माझ्यासाठी नाही. सरकारला जाब विचारण्यासाठी मनसेच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.