मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या अनेक भागात महाजनादेश यात्रा काढून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र ही महाजनादेश यात्रा मुख्यमंत्र्यांनी जनतेवर लादली आहे अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ” महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री  राज्यावर आलेले महापुराचे संकट, कर्जमाफी, किती तरुणांना रोजगार दिले? यासह अनेक प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र या प्रश्नावर त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांना अनेक भागांमध्ये जनतेचा रोष सहन करावा लागतो आहे” असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले की, “सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणार्‍या विरोधकांच्या मागे सीबीआय, ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे. यामुळे विरोधक भयभीत झाले आहे. नुकताच कडकनाथ घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी न झाल्यास लवकरच ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार”  असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

विधानसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढविणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, “भाजप आणि शिवसेना या जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी राज्यातील छोटे छोटे पक्ष एकत्रित करून आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर जागांबाबत चर्चा करु”

उदयनराजे यांच्या भाजप प्रवेश बाबत विचारले असता ते म्हणाले की, “मी काही काळ सत्ताधारी भाजप सोबत राहिलो आहे. त्या सर्वांची कामाची पद्धत लक्षात घेता. अटलबिहारी वाजपेयी आणि गोपीनाथ मुंडे यांचा भाजपा पक्ष राहीला नाही. तो आता मोदी आणि फडणवीस यांचा पक्ष झाला आहे. त्यामुळे आपण पक्ष सोडण्याच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असा सल्ला उदयनराजे यांना दिला होता” असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं.