राजू शेट्टी यांचे आव्हान

औरंगाबाद : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात उभे ठाकू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. सत्तेच्या गैरवापराची शिकवणी भाजपकडे लावावी, असे म्हणत  स्वाभिमानीकडून विधानसभेच्या ५० जागांची यादी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे कोणाबरोबर पटले तर या जागांमध्ये कमी-जास्त होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

औरंगाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणुकीविषयी भाष्य केले.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीकविम्याची रक्कम द्यावी, दुष्काळामुळे वाळलेल्या पिकांचे पंचनामे करून एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे या वेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच राजू शेट्टी यांनी बेरोजगारीचा विषयही हाती घेतला आहे. महापोर्टल बंद करावे, अशी मागणी करत राज्य सरकारने बेरोजगार युवकांना गृहीत धरणे सोडावे, हा ज्वालामुखी आहे तो केव्हाही फुटेल, असे जाहीर सभेत सांगितले. पीक विमा कंपन्यांनी सरकारची तिजोरी लुटली. स्वत: मुख्यमंत्र्यांना पीक विम्याचे घोटाळे दाखवून दिले. मात्र, कंपन्यांना जाब विचारण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.