आमच्या पक्षात होता तो पर्यंत ‘राम’ होता भाजपात गेल्यावर ‘रावण’ झाला असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपा आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधला. दहीहंडीच्या वेळी राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण राज ठाकरेंनी घाटकोपरच्या सभेत करुन दिली. इथला आमदार राम कदम तुम्हाला सांगतो एखादी मुलगी आवडली तर सांगा मी तिला तुमच्यासाठी पळवून आणेन. महिला, मुलींबाबत असं वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांना भाजपाकडून पुन्हा तिकिट मिळतं. याला सत्तेचा माज म्हणायचं नाही तर काय? सत्तेच्या माजातून राम कदम यांना भाजपाने पुन्हा तिकिट दिलं अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

काय आहे प्रकरण?
२०१८ च्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांचे हे विधान वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर प्रसारित होताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या सगळ्या प्रकरणानंतर चार दिवसांनी राम कदम यांनी वक्तव्याबाबत माफी मागितली होती.

हेच प्रकरण उचलून धरत राज ठाकरे यांनी राम कदम यांच्यावर टीका करत त्यांना रावण असं संबोधलं. काय बोलले राम कदम? मुलगी पळवून आणेन एवढंच बोलले ना? मग त्यात एवढं विशेष ते काय? म्हणून राम कदम यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. याला काय म्हणायचं? हा सत्तेचा माज नाही तर मग काय आहे असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

सत्तेची मुजोरी भाजपाला आली आहे, कारण त्यांना जाब विचारणारा विरोधी पक्षच उरलेला नाही. त्यामुळे एक चांगला आणि सक्षम पर्याय म्हणून मनसेला निवडून द्या. विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यास मी तयार आहे. तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यास मी तयार आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं.