१०० टक्के मतदानाचे समाज माध्यमावर आवाहन

नागपूर : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपच्या पराभवाला ‘नोटा’ कारणीभूत ठरला असे मानून व याचा धसका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’ला पसंती न देता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे, अशी मोहीम समाजमाध्यमांवर सुरू केली आहे.

केंद्र सरकारच्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील अध्यादेशाला विरोध म्हणून मध्यप्रदेश, छत्तीगड आणि राजस्थानात खुल्या प्रवर्गातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला पसंती दिली होती. त्याचा फटका भाजपला बसला.  महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला लागू केलेल्या आरक्षणामुळे  खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत उपराजधानीतून ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ चळवळ उभी राहिली. त्यांनी या निवडणुकीत ‘नोटा’ वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ‘नोटा’ला विरोध दर्शवणाऱ्या चित्रफितीही पाठवल्या जात आहेत.

संघ कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार करीत नाही. मात्र, ‘नोटा’ला मतदान करण्यापेक्षा सर्वोत्तम उमेदवार निवडून १०० टक्के मतदान करावे, अशी संघाची भूमिका आहे.

– समीर गौतम, महानगर प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.