उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपत असल्याने बंडखोरांनी माघार घ्यावी, यासाठी रविवारी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू होते. भाजपमध्ये यंदा बंडाचे प्रमाण अधिक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे स्वत: बंडखोरांशी चर्चा करून माघारीसाठी प्रयत्न करीत होते.

भाजपच्या वाटय़ाच्या काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच शिवसेनेविरोधात काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंड केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही असेच प्रकार घडले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची मुदत असल्याने रविवारी दिवसभर सर्व पक्षांचे नेते आपापल्या पक्षातील बंडखोरांची मनधरणी करत होते. भाजपमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही बंडखोरांच्या माघारीसाठी प्रयत्नशील होते. भाजपमध्ये ३० हून अधिक मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी अर्ज दाखल केले आहेत, परंतु दखल घेण्यासारखे पाच ते सहाच बंडखोर असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले. उर्वरित बंडखोर असले तरी त्यांचा फार काही प्रभाव पडू शकणार नाही. पक्षाचे संघटनमंत्री, स्थानिक नेते, जिल्ह्य़ाचे नेते यांच्यावर बंडखोरांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही बंडखोरांशी स्वत: मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी चर्चा केली. काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी बहुतांश अर्ज सोमवारी मागे घेतले जातील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजप-सेना परस्परांविरोधात

कोकण, पुणे, विदर्भ, मराठवाडय़ात काही मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी परस्परांविरोधात अर्ज दाखल केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रविवारी दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.  मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेले रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) उमेदवार गौतम सोनावणे हे माघार घेतील, असे पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आठवले यांच्यात चर्चा झाली. यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आाणि राष्ट्रवादीला काही मतदारसंघांमध्ये बंडाची लागण झाली आहे. युतीप्रमाणेच आघाडीतही परस्परांविरोधात अर्ज दाखल झाले आहेत. हे अर्ज मागे घ्यावेत म्हणून दिवसभर प्रयत्न सुरू होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधातील अर्ज राष्ट्रवादीने मागे घ्यावा, असे प्रयत्न सुरू होते. रायगड जिल्ह्य़ात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. रायगडमधील बंडखोरांना शांत करण्यासाठी जिल्ह्य़ातील नेत्यांना सांगण्यात आले आहे.  वंचित आघाडीतही काही ठिकाणी बेबनाव निर्माण झाला असला तरी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

बंडखोरांना सत्तापदांची आशा : भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सत्तापदांच्या आशेने अनेकांनी बंडखोरी केली आहे. पक्षनेतृत्वाकडून माघारीसाठी संपर्क साधण्यात आल्यावर महामंडळ किंवा सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन मिळावे, असा काही जणांचा प्रयत्न असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. मात्र, सध्या तरी माघार घ्या, नंतर बघू, एवढेच आश्वासन देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

२७ मतदारसंघांमध्ये ११४ बंडखोर

राज्यातील २७ मतदारसंघांत भाजपच्या ११४ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक ९ बंडखोर कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड मतदारसंघात शिवसेना उमेदवाराविरोधात उभे आहेत.

शिवसेना, काँग्रेसचीही डोकेदुखी : वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली असून, त्या आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. दुसरीकडे, कॉंग्रेसने मानखुर्द- शिवाजीनगरची जागा समाजवादी पक्षाला सोडलेली असली तरी कॉंग्रेस नगरसेवक सुफियान वणू यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

कोकणात पेच

कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधात अर्ज दाखल केले आहेत. कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे सतीश सावंत यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपने सेनेच्या विरोधात अन्य दोन मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल केले. ‘शिवसेनेने युतीचा धर्म पाळलेला नाही’, अशी टीका भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी केली. नितेश राणे यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. नितेश राणेंविरोधात शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याने तिढा निर्माण झाला आहे. सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी त्याचा युतीवर अन्य ठिकाणी परिणाम होऊ शकतो. यामुळेच हा पेच सोडविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू होता.