29 September 2020

News Flash

युतीतील प्रवेश बारगळताच आघाडीचे नेते पुन्हा स्वगृही

‘बंडखोर’ आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा पावन करून घेत उमेदवारीही बहाल केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

स्वपक्षावरील नाराजी, टीकेनंतरही काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारी

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीचाच प्रभाव कायम राहण्याची अटकळ बांधून सत्तेचे संरक्षण मिळवण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधून बऱ्याच आजी-माजी आमदारांसह इतर वजनदार नेते मंडळींनी भाजप वा सेनेचे दरवाजे ठोठावले. त्यात काही जणांना दरवाजे खुले झाले तर काहींनी सतत दोन महिने जोरदार प्रयत्न करूनदेखील अखेपर्यंत प्रवेश खुला होत नसल्याचे पाहून पुन्हा स्वपक्षाकडे मोर्चा वळवला. पक्षातंराच्या या नाटय़ात स्वपक्षाबद्दल नाराजी, टीका केल्यानंतरही या ‘बंडखोर’ आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा पावन करून घेत उमेदवारीही बहाल केली आहे. सध्या या राजकीय कोलांटउडय़ा आणि पुन्हा स्वपक्षाचे पावन करून घेणे जिल्ह्य़ात चर्चेचा विषय झाला आहे.

सोलापूर जिल्ह्य़ात माढय़ाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार तथा बडे साखर कारखानदार बबनराव शिंदे, अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके, सांगोल्याचे राष्ट्रवादीचे माजी विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे या मंडळींनी विधानसभेच्या तोंडावर आपापला पक्ष सोडून भाजप वा सेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भाजप-शिवसेनेच्या दारात चकरा मारूनही या नेत्यांना महायुतीची दारे उघडली गेली नाहीत.

दरम्यान या नेत्यांच्या या बंडाने आघाडीतील दोन्ही काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला होता. त्यांच्यासोबतच्या अन्य नेत्यांच्या भाजप-सेना प्रवेशामुळे अगोदरच दोन्ही काँग्रेसला खिंडार पडलेले असताना आता हेही नेते भाजप-सेनेच्या दारात गेल्याने आघाडीचे राज्य पातळीवरील नेते खडबडून जागे झाले होते. पक्षाला पडलेले हे खिंडार बुजवण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सोलापुरात मेळावा घेतला. या मेळाव्याकडेही पक्षाचे आमदार बबन शिंदे, दीपक साळुंखे आणि सध्या राष्ट्र्वादीचे उमेदवार असलेले भालके यांनी पाठ फिरवली होती. त्या वेळी पवारांनीही या सर्व गेलेल्या आणि जाऊ इच्छिणाऱ्या नेत्यांवर टीका करत नव्या कार्यकर्त्यांंना संधी देण्याचे जाहीर केले. यानुसार दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची शोधाशोधही सुरू झाली होती.

या दरम्यानच बबन शिंदे, भारत भालके, दीपक साळुंखे आणि सिद्धराम म्हेत्रे यांचे भाजप प्रवेशाचे मनसुबे अखेर अयशस्वी ठरले आणि या सर्व इच्छुकांनी पुन्हा राष्ट्रावादी आणि काँग्रेस पक्षाकडे धाव घेतली. दोन्ही काँग्रेसनेदेखील आपल्या ठरलेल्या अन्य उमेदवारांना बाजूला करत पुन्हा याच जुन्या उमेदवारांना पावन करत पुन्हा त्यांना उमेदवारी बहाल केली. त्यांनी स्वपक्षावर, नेत्यांवरच केलेली टीका, उपेक्षा राजकारणासाठी पोटात घेत हे निर्णय घेतले.

सोलापूर जिल्ह्य़ातील मतदारांनी गेले महिनाभर पाहिलेले हे न घडलेले सत्तांतर, आरोप-प्रत्यारोप, नाराजी-टीका

आणि पुन्हा तेच पक्ष आणि तेच उमेदवार हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 4:46 am

Web Title: rebel mla again joined congress ncp zws 70
Next Stories
1 सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात युती तुटली!
2 प्रदूषणकारी उद्योगांना हिसका
3 विक्रमगड राखण्याचे भाजपसमोर आव्हान
Just Now!
X