राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सध्या मंत्रालयातील सर्व कारभार ठप्प झाला आहे. त्यातच राज्यातील गरीब जनतेचा आधार असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष देखील बंद आहे. यामुळे हजारे रुग्णांचे सरकारच्या मदतीअभावी हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा कक्ष पुन्हा सुरु करुन गरीब रुग्णांना तातडीने मदत करण्याची विनंती माजी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

मुंडे यांनी पत्रात म्हटले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. राज्यातील हजारो गरीब रुग्णांना या कक्षामार्फत वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळत होती. परंतू, या कक्षाचे कामकाज स्थगित झाले असल्याने राज्यातील गरीब रुग्णांना मिळणारी मदतही बंद झाली आहे. परिणामी, वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झालेले रुग्ण किंवा दाखल होऊ इच्छिणाऱ्या रुग्णांसमोर आर्थिक समस्या उभी राहिली असून त्यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंडेंनी राज्यपालांना विनंती केली की, राष्ट्रपती राजवटीत राज्य शासनाचा कारभार सुरु ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर आहे. राज्य प्रशासनाने आपल्या अनुमतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष पुन्हा सुरु करुन गरीब रुग्णांना तातडीने मदत सुरु करण्याची आवश्यकता आहे.

हा विषय अत्यंत तातडीने विचारात घेण्याचा असून राज्यातील गरीब रुग्णांच्या आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे आपण याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून गरीब रुग्णांची आर्थिक मदत पूर्ववत सुरु करण्याचे राज्य प्रशासनाला निर्देश द्यावेत.