अरविंद इनामदार, (निवृत्त पोलीस महासंचालक)

* निवडणुकीतील मुख्य मुद्दे कोणते?

– सामाजव्यवस्थेत पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पण शासनाच्या या महत्त्वाच्या अंगाला कायम सापत्न वागणूक मिळते. पगार तुटपुंजा, अनियमित कामाचे तास, बढतीचे क्लिष्ट नियम, अपुऱ्या पडणाऱ्या शासकीय वसाहती, मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेली पोलीस ठाणी, पोलिसांवरील वाढते हल्ले, अशा अनेक अडचणी पोलिसांसमोर आहेत. या अडचणी पोलिसांच्या मनावर, शरीरावर आघात करत असतात. त्याचा परिणाम पोलिसांच्या कामावर दिसून येतो. या अडचणी दूर झाल्या तरच पोलीस दल उत्साहाने, अचूकरीत्या नेमून दिलेले कर्तव्य बजावू शकेल.

* राजकीय पक्ष या मुद्दय़ांना भिडतात का?

– एकाही राजकीय पक्षाला पोलीस दलाच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही. प्रत्येक पक्ष मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधी, पोलीस दलाला आपल्या फायद्यासाठी कसे वापरून घेता येईल याचाच विचार करतो. पोलिसांना गृहीत धरले जाते. फक्त मनुष्यबळ वाढवून पोलिसांवरील ताण कमी होणारा नाही. त्यासाठी संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल, याची जाणीव एकाही राजकीय पक्षाला नाही.

* तुम्ही उमेदवार असता तर?

– पोलीस प्रशिक्षणापासून न्यायव्यवस्थेपर्यंत आमूलाग्र बदल करण्यासाठी आग्रह धरला असता. गुन्ह्य़ांची पद्धत आणि वृत्ती बदलते आहे. त्यानुसार प्रशिक्षणात बदल अपेक्षित आहेत. गुन्हा घडल्यापासून वर्षांच्या आत न्यायनिवाडा झाला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपाययोजना केल्या असत्या. पोलीस ठाण्यांची अवस्था बदलली असती. मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्याच असत्या, पण त्यासोबत पोलीस अधिकारी, अंमलदारांना पोषक, उत्साहवर्धक वातावरण पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध करून दिले असते.

* नवमतदारांना काय सल्ला द्याल?

– नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. मत द्यायचे म्हणून देऊ नका, उमेदवाराचे काम, तो प्रतिनिधत्व करतो त्या पक्षाची भूमिका, स्थानिक समस्या सोडवण्यासाठी उमेदवाराची धडपड आदी मुद्दे विचारात घेऊन जबाबदारीने तरुणांनी मतदान करावे.

* प्रचारात कोणत्या गोष्टी टाळणे अपेक्षित आहे?

– अपप्रचार, खोटी माहिती, अश्लील टीका, चारित्र्यहनन आदी प्रचारात टाळणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे प्रचार करणाऱ्या उमेदवाराची संबंधित राजकीय पक्षाने दखल घेऊन कारवाई करावी. मतदारांनीही अशा उमेदवाराची दखल घेऊन मत कोणाला द्यायचे हे ठरवावे.

(संकलन : जयेश शिरसाट)