विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा चर्चेत आलेल्या शिखर बँक घोटाळ्यात आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. शिखर बँकेच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रोहित पवार यांच्या नावाचा देखील समावेश आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत केला.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर पकडला आहे. प्रचारासाठी मोजकेच काही दिवस शिल्लक असून, सर्वच पक्षांचे नेते राज्यातील मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी नाशिकमध्ये होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी शिखर बँक घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “शिखर बँकेच्या ज्या घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांचे नाव आहे. त्याच प्रकरणात एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेमध्ये संचालक असलेल्या रोहित पवार यांचे नावही आहे. नाबार्ड, कॅग आणि रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ही माहिती आहे, असा दावा सोमय्या यांनी केला.

आणखी वाचा : … म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस; मुख्यमंत्र्यांची माहिती

या संपूर्ण घोटाळ्याबाबत राज्य सरकारने समिती गठित करून दिलेल्या अहवालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या प्रकरणातील एका कारखान्याच्या खरेदी प्रकरणात संचालक असलेल्या रोहित पवार यांचे नाव आहे आहे, असं सोमय्या म्हणाले.
शरद पवारांचं नाव ईडीच्या अहवालात आल्याने राजीनामा दिल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यावर सोमय्या म्हणाले, “ईडीच्या अहवालात शरद पवार यांचं नाव आल्याने दुःख झाल्याचं कारण सांगत अजित पवारांनी राजीनामा दिल्याची चर्चा झाली. मात्र, या प्रकरणातील ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच राजीनामा नाट्यामागील खरे नाट्यदेखील उलगडले जाईल, असं सोमय्या यावेळी म्हणाले.

शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तब्बल ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून बराच गदारोळ झाला. शरद पवार यांनी थेट ईडीलाच आव्हान दिले होते. मात्र, चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने पवारांनी ईडी कार्यालयात जाणं टाळल होतं. त्यानंतर शिखर बँक आणि ईडीचं प्रकरण पाठीमागे पडले. मात्र, किरीट सोमय्यांनी रोहित पवार यांचं नाव घेऊन खळबळ उडवून दिली आहे. रोहित पवार हे राज्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांच्याविरूद्ध निवडणूक लढवत आहेत.