News Flash

“राजकारणात फायदा-तोटा न पाहता बाळासाहेबांनी प्रसंगी काँग्रेसला देखील पाठिंबा देवू केला”

"प्रत्येक निर्णय घेताना लोकांचं भलं करणं हाच एकमेव विचार त्यांच्या मनात असे"

प्रणब मुखर्जी आणि बाळासाहेब

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये रविवारी अनेक पक्षांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. ट्विटवरुनही अनेक दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यामध्ये रोहित यांनी अगदी पहिल्यांदा मुंबईत कॉलेजमध्ये आल्यापासून ते पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन उभारलेल्या कलादालनाचाही उल्लेख केला आहे.

रोहित यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून बाळासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या राजकारण्याच्या शैलीपासून केली. “मी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली,” असं रोहित म्हणतात.

पुढे त्यांनी बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची आठवण करुन दिली आहे. “महाराष्ट्राच्या या भूमीला रत्नांची खाण म्हणलं जातं. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब, स्व.बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्याप्रमाणेच अनेक रत्ने या महाराष्ट्राच्या भूमीने देशाच्या राजकारणाला दिली. मला या सर्वच लोकांच विशेष यासाठी वाटतं की हे सर्वजण आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम असत. प्रत्येक निर्णय घेताना लोकांच भलं करणं हाच एकमेव विचार त्यांच्या मनात असे. म्हणूनच राजकारणात फायदा-तोटा न पाहता बाळासाहेबांनी प्रसंगी काँग्रेसला देखील पाठिंबा देवू केला. प्रतिभाताई पाटील, तसेच प्रणब मुखर्जी यांसारखे व्यक्ती राष्ट्रपती व्हावेत म्हणून अगदी खुल्या मनाने पाठिंबा दिला,” असं रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पुढे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कशाप्रकारे पुण्यामध्ये बाळासाहेबांच्या नावाने कलादालन सुरु केले याबद्दलची माहिती दिली आहे. “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा वेळोवेळी सन्मान केला आहे. मा.अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत सत्ता असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त कलादालन उभा करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला होता. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने असणाऱ्या या कला दालनाचे उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी केले होते. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीनिमित्त उभा करण्यात आलेली ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली वास्तू असेल,” असं ते म्हणतात.

तर पोस्टच्या शेवटी त्यांनी “थेट भूमिका घेणारी अशी माणसं महाराष्ट्राला लाभली हे आपलं भाग्य आहे असे मी समजतो. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन,” असं म्हटलं आहे.

एकाकीडे रोहित यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दलचा उल्लेख केला असतानाच दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे यांनीही “उद्धव ठाकरे यांना सात वर्षांमध्ये बाळासाहेबांचे एक स्मारक नाही बांधता आले याबद्दल लाज वाटली पाहिजे,” असा टोला ट्विटवरुन लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 1:28 pm

Web Title: rohit pawar post about balasaheb thackeray on his death anniversary scsg 91
Next Stories
1 ‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, हा घ्या पुरावा’; राष्ट्रवादी काँग्रेसचे ट्विट
2 १०५ वाल्यांकडून स्वाभिमान गहाण वगैरे ठेवण्याची भाषा होत आहे : सेना
3 उपवर मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय!
Just Now!
X