सातारा येथील सभेत शरद पवार यांनी पावसाची पर्वा न करता भाषण केलं ही बातमी ताजी असतानाच आता त्यांचे नातू रोहित पवार यांचीही अशीच बातमी समोर आली आहे. रोहित पवार हे बोलत असताना पाऊस सुरु झाला. भर पावसात त्यांनी भाषण सुरु ठेवलं. रोहित पवार यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांनी एकत्र या, मतदान करा. आपल्या विचारांचा उमेदवार निवडून कसा येईल हे सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे असं रोहित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले.

साताऱ्यात शरद पवार हे भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी ते बोलत असतानाच पाऊस सुरु झाला. पावसात भिजत शरद पवार यांनी त्यांचं भाषण सुरु ठेवलं. वरुणराजा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. आता महाराष्ट्रात परिवर्तन नक्की घडेल असं शरद पवार म्हणाले. तसंच कोणतीही चूक हातून झाली तर ती मान्य करायची असते. लोकसभेच्या वेळी साताऱ्यात मी चूक केली आता ती सुधारा आणि श्रीनिवास पाटील यांना विजयी करा असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.

शरद पवार यांनी पावसात भाषण केल्याने त्यांनी भाजपा आणि शिवसेना नेत्यांचा प्रचार धुऊन टाकला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रात्रीपासूनच या भाषणाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे होत असतानाच आता रोहित पवार यांचाही पावसात भिजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. रोहित पवार यांनीही आजोबा शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत. पाऊस आला तरीही न थांबता ते भाषण करत राहिले आणि विरोधकांवर बरसले तसेच त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा असेही आवाहन केले.