राज्यामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी त्यांनी मरिन ड्राइव्हवर मॉर्निंग वॉक करत अनोखा प्रचार केला. या वॉकसाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारी ठाण्यामध्ये झालेल्या फडणवीस यांच्या सभेला मिळालेला अल्पप्रतिसादही या वॉकला मिळालेल्या प्रतिसादाप्रमाणे चर्चेत आहे.

शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावरच फडणवीस यांची सभा झाली. मात्र या सभेमधील रिकाम्या खुर्च्या चांगल्याच चर्चेत राहिल्या. या सभेला गर्दी न झाल्याचे खापर आता शहरामधील शिवसेना आणि भाजपाचे नेते एकमेकांवर फोडताना दिसत आहे. दरम्यान राज्यमंत्री आणि डोंबिवलीतील भाजपाचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी सभेला गर्दी न जमवल्याबद्दल शहरातील भाजपा नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. शुक्रवारी सभा झाल्यानंतर चव्हाण यांनी शनिवारी तातडीची बैठक घेऊन भाजपाचे ठाणे शहरातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला. अतिआत्मविश्वास ठेऊ नका त्याचा फायदा विरोधकांनाच होईल अशा शब्दांमध्ये चव्हाणांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील सभेसाठी महानगरपालिकेच्या चौकातच मोठा मंच टाकण्यात आला होता. तर रस्त्यावरच दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून खुर्चा टाकण्यात आल्या होत्या. मात्र या सभेला गर्दीच न झाल्याने शेकडो खुर्चा रिकाम्याच होत्या. बऱ्याच खुर्चा बॅरिकेट्सच्या बाहेर एकात एक घालून ठेवण्यात आल्या होत्या. याचाच व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायर झाला आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला कमी प्रतिसाद मिळत असल्याचा प्रचार सुरु केल्यानंतर चव्हाणांनी शनिवारी खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात भाजपाच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सभेसाठी गर्दी जमवण्यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये योग्य पद्धतीने संवाद झाला नाही असं कारण पदाधिकाऱ्यांनी दिले. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेना गर्दी जमवेल असं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वाटले होते. मात्र तुमच्या सभेला तुम्ही गर्दी जमवाल असं वाटल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी भजापाच्या नेत्यांना ऐनवेळी सांगितल्याने गोंधळ झाल्याचे समजते. याच गोंधळात सभेला गर्दी जमलीच नाही असं स्पष्टीकरण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांना दिले.

पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘या पुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्या’ असं चव्हाणांनी सांगितले. ‘आपला विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका. अतिआत्मविश्वास ठेऊ नका. गर्दी का झाली नाही यावरुन वाद न घालता असं का झालं हे शोधा’, असं चव्हाणांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.