शिवसेनेचं सरकार फार काळ टिकणार नाही. कर्नाटकातील सरकारचं काय झालं हे सर्वांना माहित आहे. कर्नाटकात पुन्हा भाजपाचंच सरकार आलं. त्या ठिकाणी पुन्हा येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालं. तसंच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रात होईल, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेला मुख्यमंत्री आपला बनवायचा असेल तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक आहे. परंतु त्यांनी पाठिंबा दिला तर शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही अटी मान्य कराव्या लागतील. शिवसेना तसं वागेल की नाही हे दिसून येईल. जेव्हा त्यांना कळेल की आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागू शकत नाही तेव्हा शिवसेना पद सोडेल, असं वैद्य यावेळी म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते बोलत होते.

भाजपाने आपल्या मागणीवर कायम राहावं. त्यांनी मुख्यमंत्रिपदावर जो दावा केला आहे तो त्यांनी सोडू नये. शिवसेनेला ते उपमुख्यमंत्रिपद देऊ शकतात. यावर शिवसेना जर तयार होत असेल तर ती उत्तम गोष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद अडीच वर्ष शिवसेनेकडे आणि अडीच वर्ष भाजपाकडे असं भाजपानं मान्य करू नये, असंही वैद्य म्हणाले. जर हे शिवसेनेला मान्य नसेल तर मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपाला मोठा पक्ष म्हणून बोलावेल. त्यानंतर त्यांनी आपलं सरकार स्थापन करावं. बहुमत सिद्ध करताना कोण कोणाच्या बाजूनं आहे हे दिसून येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.