मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील पारसिक बोगद्याजवळ गुरुवारी मांडवी एक्स्प्रेसमधून फेकलेल्या बाटलीमुळे रुळांवर काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. अशा वाढत्या घटनांमुळे रुळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची संघटना आक्रमक झाली आहे.

संपत बाबड हे गुरुवारी सकाळी रूळ देखभालीचे काम करत होते. यावेळी मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून एक बाटली त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आली. यात संपत यांना गंभीर दुखापत होऊन त्यांच्या हाताचे हाडही तुटले आहे. त्यांना उपचारासाठी कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दोनच महिन्यांपूर्वी एका कर्मचाऱ्याला बाटली फेकून मारण्यात आली होती. यात तो कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. अनेकदा रेल्वे रुळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर लोकल गाडय़ांमधील प्रवाशांकडून हल्ले केले जातात.

धावत्या लोकलमधून लागलेला मार हा अत्यंत गंभीर असतो. त्यामुळे अशा प्रवाशांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे ‘सीआरएमएस’ या रेल्वे संघटनेचे युवा अध्यक्ष मंतोश मिश्रा यांनी सांगितले. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे संघटनेचे साहाय्यक सचिव मनोज कवडे यांनी सांगितले.