बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. आदित्य ठाकरे माझ्या लहान भावासारखा असून आपल्या देशाला आदित्यसारख्या युवा आणि डायनॅमिक नेत्याची गरज आहे, असं संजय दत्तने म्हटलं आहे.

“आदित्य ठाकरे माझ्या लहान भावासारखा आहे. मोठे साहेब, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला आणि माझ्या कुटुबाला सर्वतोपरी मदत केली. ते मी कधीच विसरू शकत नाही. उद्धव ठाकरेंनीही नेहमी पाठिंबा दिला. आदित्यला निवडणुकीसाठी माझ्या शुभेच्छा. मला वाटतं आपल्या देशाला आदित्यसारख्या युवा आणि डायनॅमिक नेत्याची गरज आहे. भरघोस मतांनी आदित्य निवडणूक जिंकेल असा विश्वास आहे,” असं संजय दत्तने म्हटलं आहे. राहुल कनाल यांनी संजय दत्तचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये राहुल कनाल यांचा समावेश होतो.

दरम्यान, आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या रणांगणाच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना मैदानात उतरविले आहे. त्यातच बिग बॅास फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकलेवरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. तसेच राज ठाकरे पुतण्या विरोधात उमेदवार न दिल्याने आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघातून विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.