महाराष्ट्रात भाजपा -शिवसेनेत सत्तास्थापनेवरून एकमत न झाल्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. तसेच, शिवसेनेने एनडीएची साथ सोडत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाशिवआघाडी निर्माण केली असल्याचा पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी शिवसेनेसह शिवसेना नेते व संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम माधाव यांनी शिवसेना आणि भाजपमधील सध्याच्या संबंधांवर भाष्य करताना, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे ‘जोसेफ गोबेल्स’ असल्याची खोचक टिप्पणी केली आहे. याचबरोबर त्यांनी शिवसेनेला भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये स्थान मिळेल, ही शक्यता मावळल्यात जमा असल्याचेही सांगितले आहे. सीएनएन-न्यूज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच, संजय राऊत यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आणले. त्यांनीच सूर्ययान (आदित्य ठाकरे) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरवायचे असल्याचे म्हटले होते. तोपर्यंत शिवसेनेतील कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रीपदाबाबत चकार शब्द काढला नव्हता, याकडे राम माधव यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने आमच्या नेत्यांवर नाव घेऊन टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मला पुन्हा समेटाची शक्यता दिसत नाही. शिवसेनेकडूनही तसे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut is goebbels of uddhav thackeray ram madhav msr
First published on: 14-11-2019 at 21:29 IST