शिवसेनेकडून संजय राऊत सातत्याने पक्षाची भूमिका मांडत असताना आता भाजपाकडून प्रसाद लाड यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. खासदार संजय राऊत यांना पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकारच नाही असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. ते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची स्थिती अद्यापही स्पष्ट झालेल नाही. सत्तेत वाटयावरुन शिवसेना-भाजपात परस्परांवर कुरघोडीचे राजकारण रंगले आहे.

संजय राऊत शिवसेनेचे नेते असले तरी त्यांना अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांच वक्तव्य अधिकृत मानता येणार नाही असे प्रसाद लाड म्हणाले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालेले देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे. पुन्हा सरकार आम्हीच स्थापन करु. उद्धव ठाकरे एक परिपकव्य राजकारणी आहेत असे लाड म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत
ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते असंही त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर तसे घडणार असेही राऊत यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सत्तेत समसमान वाटा हवा अन्यथा शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते आणि आपला मुख्यमंत्रीही बसवू शकते असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.