News Flash

“यशवंतराव यांना राष्ट्रपतींनी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते पण…”

इतिहासाचा संदर्भ देत राऊतांनी भाजपा आणि अजित पवारांवर साधला निशाणा

राऊतांनी भाजपा आणि अजित पवारांवर साधला निशाणा

भाजपाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने शनिवारी राज्यामध्ये सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अजित पवार आणि भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्याची टीका केली होती. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राऊतांनी जुना किस्सा सांगत भाजपा आणि अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत.

मुंबईमध्ये राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील सत्तेसाठी भाजपाने गुंडगिरी केल्याचा आरोप केला. बहुमत नसतानाही भाजपाने अजित पवारांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करुन शपथविधी उरकल्याचा आरोप राऊतांनी केला. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना बहुमत नसताना सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आलं असताना त्यांनी नकार दिल्याची आठवण करुन दिली. “जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर विरोधीपक्ष नेता असणाऱ्या यशवंतरावांना राष्ट्रपतींने सरकारस्थापनेसाठी बोलवलं त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. सर्वात मोठा पक्ष असताना लोकशाहीच्या दृष्टीने यशवंतरावांनी घेतलेली भूमिका अशी होती की ते राष्ट्रपतींना भेटले आणि माझ्याकडे बहुमत नसल्याने मी सरकार स्थापन करु शकत नाही असं सांगितलं. राष्ट्रपतींनी शपथ घ्या आणि नंतर बहुमत सिद्ध करा असं सांगितलं. लोकशाही संकेताला हे धरुन नसल्याचे यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं,” असा किस्सा राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितला.

पुढे याचाच संदर्भ घेत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. “यशवंतरावांनी घेतलेल्या या अशा निर्णयाचा इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि अजित पवारांनी जो पायंडा पाडला आहे तो यशवंतरावांच्या भूमिकेला आणि कार्याला मारक आहेत. बहुमत नसताना शपथ घेतली आणि बहुमतासाठी सत्तेचा, पैश्याचा आणि तपास यंत्रणांचा गैरवापर केला. आम्ही या सर्वांना पुरुन उरु. तुम्ही कितीही गडबड करा किंवा घोटाळा करा विधिमंडळामध्ये विश्वासदर्शक ठरवाच्या वेळेला आमचा आकडा तुमच्यापेक्षा दहाने जास्त असेल,” असा विश्वास राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 12:35 pm

Web Title: sanjay raut slams bjp by giving example of yashwantrao chavan scsg 91
Next Stories
1 “आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या”, महाविकास आघाडीने सोपवलं १६२ आमदारांच्या सह्या असणारं पत्र
2 महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचे संसदेत पडसाद
3 शालिनीताई का म्हणाल्या, खंजीर खुपसण्याचा अर्थ आज पवारांना कळाला असेल…
Just Now!
X