एजाजहुसेन मुजावर 
सोलापूर जिल्ह्य़ात ढासळलेला बालेकिल्ला सांभाळण्याचा प्रयत्न करताना राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा राखल्या असताना माळशिरसमध्ये शेवटपर्यंत झुंज देऊन भाजपला घाम फोडला होता. तर दुसरीकडे बार्शीत शेवटच्या क्षणी पक्षातून फुटून शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री दिलीप सोपल यांचा पराभव होताना त्यात राष्ट्रवादीने हातभार लावल्याचे दिसून आले. मात्र सोलापूर शहर उत्तरमध्ये राष्ट्रवादीचा कमकुवत उमेदवार भाजपाचा बालेकिल्ला आणखी भक्कम करण्यासाठी महत्त्वाचा ठरल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान निवडणूक होऊन एक दिवस उलटण्याच्या आतच राष्ट्रवादी पुरस्कृत संजय शिंदे हे भाजपच्या वळचणीला गेले आहेत. त्यामुळे करमाळ्यात राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

सोलापुरात अकरापैकी आठ जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले होते. परंतु त्यात सांगोला व करमाळा येथे गोंधळ उडाला. सांगोल्यात शेकापला पाठिंबा दिलेला असतानाही पुन्हा माजी विधान परिषद सदस्य तथा पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली गेली आणि नंतर ती उमेदवारी पक्षाची नाही, असे राष्ट्रवादीला जाहीर करावे लागले. असाच प्रकार करमाळ्यातही घडला होता. तेथे पक्षाने संजय पाटील-घाटणेकर यांना उमेदवारी दिली. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. परंतु नंतर पक्षाने त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आल्याचे सांगून अपक्ष संजय शिंदे यांना पुरस्कृत केले. शिंदे हे पक्षबदलू म्हणून ओळखले जातात. ते निवडून आले असले, तरी राष्ट्रवादीचा त्यांना लगेच विसर पडला आहे. स्वत:च्या सोयीप्रमाणे ते भाजपच्या वळचणीला गेले आहेत. त्यामुळे करमाळ्यात राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
Bhavana Gawali on yavatmal loksabha constituency
“मैं मेरी झांसी नहीं दूंगी”, भावना गवळी लोकसभा उमेदवारीसाठी ठाम; म्हणाल्या, “१३ खासदार शिंदेंबरोबर गेलो तेव्हा…”
cross voting in Rajya Sabha elections
राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला उधाण? आता निकालाकडे सर्वांचे लक्ष!

माढा, पंढरपूर व मोहोळ या तीन ठिकाणी राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. तर माळशिरसमध्ये भाजपशी शेवटपर्यंत जोरदार टक्कर देत विजयाच्या दारापर्यंत पोहोचण्याइतपत राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी मजल मारली होती. त्यांना एक लाख ९१७ इतकी लक्षणीय मते (४६.८९ टक्के) पडली. तर भाजपचे विजयी उमेदवार राम सातपुते यांना (४८.८९ टक्के) जानकर यांच्यापेक्षा केवळ २५९० मते जास्त मिळाली आणि ते भाग्यशाली ठरले. या ठिकाणी मोहिते-पाटील यांची भक्कम साथ असून असताना भाजपला निसटता विजय मिळाला. या विजयापेक्षा राष्ट्रवादीला मिळालेल्या भरघोस मतांची चर्चा अधिक होत आहे. बार्शीत पक्षाची साथ सोडून शिवसेनेत गेलेले दिलीप सोपल यांना भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी चुरशीच्या लढतीत केवळ २१९० मतांच्या फरकाने पराभूत केले. मात्र भाजप बंडखोर राऊत हे विजयी झाले असले, तरी पराभूत सोपल यांना घरी बसविताना राष्ट्रवादीचा हातभार लागला आहे. सोपल यांच्या विरोधात राष्ट्रवादीने निरंजन भूमकर यांना उभे केले होते. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बार्शीत जंगी प्रचार सभाही घेतली होती. परिणामी, भूमकर यांना सुमारे १५ हजार मते मिळाली आणि ही मते निर्णायक ठरली.

सोलापूर शहर उत्तर हा भाजपचा बालेकिल्ला असून येथून पालकमंत्री विजय देशमुख यांनी सलग चौथ्यांदा बाजी मारली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे उभे होते. त्यांची उमेदवारीच पालकमंत्री देशमुख यांच्यासाठी भाग्याची मानली गेली. देशमुख यांनी एकतर्फी ९६ हजार ५२९ मते (६३.६४ टक्के) मिळविताना प्रतिस्पर्धी सपाटे यांना मतदारांनी अक्षरश: झिडकारले. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची अवघी १९ हजार २०५ मते (१२.६५ टक्के) पडली. द्वितीय क्रमांकाची २३ हजार ४६१ मते (१५.४७व टक्के) वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनी घेतली. सपाटे यांना मतदारांनी का झिडकारले, याचा मागोवा घेतला असता धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतदारांसह खुद्द शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या मतदारांनीही सपाटे यांना मते दिली नसल्याचे दिसून आले.

दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन झाले. त्या वेळी निवडणूक प्रचाराच्या धामधूमीतही वेळ काढून सपाटे यांनी डोक्यावर संघाची काळी टोपी परिधान करून संघ स्वयंसेवकांच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी संघाचे मुक्तकंठाने कौतुकही केले होते. हे कृत्यामुळे ते भलतेच अडचणीत आले. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेकांनी प्रचारापासून अंग काढून घेतले.