साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना कठीण जाईल, असे भाकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महायुतीतील नेत्यानेच हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

राऊत म्हणाले, “उदयनराजेंना निवडणूक अवघड जाण्यामध्ये शरद पवारांच्या प्रचाराचा प्रश्न येत नाही. तर तुम्ही तीन महिन्यांत एका पक्षाच्या तिकीटावर निवडून येता. त्यानंतर तीन महिन्यांनी तुमचं हृदय परिवर्तन होतं आणि तुम्ही लोकांवर निवडणूक लादता, हे कोणीही करु नये. तु्म्हाला भाजपाकडून निवडणूक लढायचीच होती तर सुरुवातीलाच लढायची होती. तुमच्या जीवनामध्ये, विचारांमध्ये, हृदयामध्ये तीन महिन्यांत असं काय घडलं की, तुम्हाला २० ते २५ कोटी रुपयांचा सरकारच्या तिजोरीवर भार टाकून लोकसभा लादावी लागली, अशा प्रकारे लोकांना गृहीत धरण्याचा परिणाम साताऱ्यातून दिसेल.”

मी ज्या लोकांशी बोललो, जी माहिती घेतली त्यानुसार उदयनराजेंना ही निवडणूक कठीण जाईल, असे जाणवते. आत्तापर्यंत ज्या प्रकारे उदयनराजे सहजपणे फिरत होते मात्र आता आपल्या विजयाबाबत ते ठामपणे सांगू शकत नाहीत, त्यांना निवडूक कठीण गेलीय हे माझं विश्लेषण आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला नेतृत्व नव्हतं त्यामुळे या निवडणुकीत त्यांचेही नेतृत्व शरद पवारांनीच केले. शरद पवारांनीच निवडणुकीत रंगत आणली. पवार जर हिंमतीनं उतरले नसते तर ही निवडणूक बेचव झाली असती. जिंकणार होतो आम्हीच पण त्या जिंकण्याला पण चव असावी लागते, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.