एकीकडे विधानसभेचे चुरस सुरु असतानाच साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. याबरोबर राज्यातही राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेही या जल्लोषामध्ये सहभागी झाल्या. कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे.. कोण आला.. मोदी शहाचा बाप आला’च्या घोषणा दिल्या. या घोषणांबद्दल सुळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिली.

शिवसेना-भाजपा युती बहुमताचा आकडा गाठणार असले तरी महाआघाडीनेही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी ५५ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस ५४ जागी आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीच्या आघाडीमध्ये शतकी मजल मारल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यामध्ये सुळेही सहभागी झाल्या. यावेळेस कार्यकर्त्यांनी सुळे यांच्यासमोरच ‘कोण आला रे.. कोण आला.. मोदी शहाचा बाप आला’च्या घोषणा दिल्या. या घोषणांसंदर्भात सुळे यांना विचारण्यात आले असता त्यांनी, “या घोषणा आजच्या नाहीत मागील वीस दिवसांपासून सुरु आहेत,” असं उत्तर हसत हसत दिले.

याच घोषणांनी झाले होते पवारांचे स्वागत

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या खासदारकीचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीआधीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांनी दूर्लक्ष केल्याने पक्षाला गळती लागल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे पक्षामधील अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेची वाट धरल्याने अधिक पडझड होऊ नये या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच सातारा मतदारसंघाला भेट दिली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीने साताऱ्याची लोकसभेची ही जागा प्रतिष्ठेची केली होती. उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्य़ात गेले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रसतर्फे महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याच रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार पोहचले तेव्हा त्यांचे साताऱ्यामध्ये जंगी स्वागत केले होते. ‘कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला’ अशा घोषणा राष्ट्रवादीच्या समर्थकांनी दिल्या होत्या.

पाटील यांच्या विजयावर पवार म्हणतात..

श्रीनिवास पाटील यांच्या विजयाबद्दल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आनंद व्यक्त केला. “साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झाला आहे. कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचं समर्थन केलं नाही हे लोकांनी दाखवून दिलं आहे. सत्ता जाते, सत्ता येते मात्र पाय जमिनीवरच ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद जनतेला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झालं आहे. श्रीनिवास पाटील हे एकेकाळचे संसदेचे सदस्य होते. एका राज्याचं राज्यपाल पद त्यांनी सांभाळलं म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवारी दिली. सातारच्या जनतेने चांगल्या मतांनी त्यांना निवडून दिलं त्याबद्दल सातारकरांचा आभारी आहे,” असं मत पवारांनी नोंदवलं. तसेच आपण साताऱ्याला जाऊन आपण जनतेचे आभार मानणार आहोत असंही त्यांनी सांगितलं.

पाटील म्हणाले, “उदयनराजेंचा हा पराभव म्हणजे…”

राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसलेंचा पराभव केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवारांना दगा दिल्यानेच उदयनराजेंचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती. मला पहिल्या दिवसापासून पाठिंबा मिळत होता. त्यामुळे विश्वास वाढला होता. पवारांनी पावसात भिजत केलेल्या भाषणामुळे पवार, राष्ट्रवादीसंबंधी सहानुभूतीची एक लाट निर्माण झाली होती,” असं मत पाटील यांनी व्यक्त केले.