23 October 2019

News Flash

जातीयवाद निर्माण करणाऱ्या भाजपाला चले जाव म्हणा: शरद पवार

अहमदनगर येथील सभेत शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

जातीयवाद निर्माण करणाऱ्या, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या, भाजपा आणि तत्सम संघटनेला चलेजाव सांगण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये केले.

” आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आता संघर्ष आणि लढाईला सुरुवात झाली आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्याची ओळख ही देशासाठी महत्त्वाची कामगिरी केलेला जिल्हा अशी होते. देशाच्या स्वातंत्र्याचे बिगुल याच भागातून वाजले. त्यामुळे प्रतिगामी विचारांची, जातीयवाद निर्माण करणारी, काळ्या आईचा इमान राखणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी भाजपा आणि तत्सम संघटनेला चले जाव हे सांगण्याचे काम आपल्याला करायचे आहे ” असे आवाहन शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात केले.

इतकेच नाही तर, “पण मावळतीचा इतिहास बघणारे नाहीत तर उगवतीचा इतिहास बघणारे आहोत हे विसरुन चालणार नाही. अनेकजण आपल्याला सोडून गेले. त्यांना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ. नगरसारखा जिल्हा शेतीप्रमाणे शिक्षणातही पुढे आहे. मात्र आज त्यांना नोकऱ्या कुठेही मिळत नाहीत. ही सत्ता आमच्याकडे आल्यास रोजगारात देशातील क्रमांक एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राचे कौतुक होईल यात शंका नाही” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

चले जाव ही चळवळ इंग्रजांविरोधात उभी करण्यात आली होती. याच चळवळीचा संदर्भ घेऊन शरद पवार यांनी भाजपाला जनतेने चले जाव असं म्हटलं पाहजे असं आवाहन केलं. निवडणूक कार्यक्रम आजच जाहीर झाला. 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा सामना रोजच पाहण्यास मिळणार आहे.

First Published on September 21, 2019 9:22 pm

Web Title: say chale jav to bjp says sharad pawar in ahamadnagar speech scj 81