परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल

उस्मानाबाद : भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या पाठापोठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी पाडण्यात आली आहे. शाळेत पाचवी ते दहावीच्या सहामाही परीक्षा सुरू असतानाही प्रशासनाने शाळा आणि परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केल्यावरून समाजमाध्यमांतून या प्रकाराचा निषेध आणि टीका सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने प्रचारसभा शाळांच्या प्रांगणात घेऊ नयेत, असे निर्देश दिलेले असताना त्याकडे कशी डोळेझाक होत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

उस्मानाबादमध्ये सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी खासदार ओम राजेिनबाळकर यांच्या पत्रानुसार शाळेच्या प्रांगणाची परवानगी जिल्हा परिषद प्रशासनाने दिली होती. परवानगी देतेवेळी शाळा व परिसराची काळजी घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, शिवसेना नेत्यांनी याला न जुमानता दोन ठिकाणी संरक्षक भिंत पाडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे शाळेतील सहामाही परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

शाळेत सोमवारी पाचवी ते आठवीची परीक्षा आणि नववी व दहावीचा गणित, विज्ञान आणि हिंदी विषयाची परीक्षा होती. शाळेची वेळ सकाळी ९ ते १२ होती. मात्र, ती ठाकरे यांच्या सभेमुळे ७.३० ते १०.३० अशी करून वेळेचे गणित घातले गेले. परीक्षा कक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे सभास्थळ अवघ्या दहा ते पंधरा फुटावर होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सहा दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील बडय़ा नेत्यांनी प्रचारसभांचा सपाटा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोमवारी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सात सभा होत्या. त्यापैकीच एक सभा उस्मानाबादमध्ये होती.अन्य ठिकाणी मुबलक जागा असताना  सरकारी शाळेच्या प्रांगणाचा वापर सभेसाठी करण्यात आला. संरक्षक भिंत तोडणे व विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यास प्रशासनास भाग पाडल्याने समाजमाध्यमात या प्रकाराचा निषेध व टीका होत होती.

सभा आणि शाळेच्या वेळेमध्ये थोडासाच फरक होता. त्यामुळे सभेसाठी शिक्षणाधिकारी सविता भोसले यांनी शाळेची वेळ बदलण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार वेगवेगळ्या तुकडीनुसार विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या. यासंदर्भात शिक्षणाधिकारी भोसले या अधिक माहिती देऊ शकतील, असे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी सांगितले. त्यानुसार  शिक्षणाधिकारी सविता भोसले यांच्याशी संपर्क केला. मात्र त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.