लातूर ग्रामीण, पलूस कडेगाव मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते ‘नोटा’ला

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदारांना खुश करून आपलेसे करण्यासाठी उमेदवांनी अनेक क्लृप्त्या लढवून, विविध आश्वासनांची खैरात करूनही राज्यातील सात लाख ४३ हजार मतदारांनी सर्वपक्षीय उमेदवारांबाबत अविश्वास व्यक्त करीत (यापैकी कोणीही नाही) नोटाचा पर्याय स्वीकारत आपली नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. मतदानादरम्यान नोटाचा पर्याय शहरी भागातील मतदारांनी अधिक प्रमाणात स्वीकारल्याचे दिसून येत असून, लातूर ग्रामीण, पलूस कडेगाव या मतदार संघात तर विजयी उमेदवारानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते नोटावर पडल्याने राजकीय पक्षांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानादरम्यान ६१.१३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा ३२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निवाडा केला होता. गुरूवारी झालेल्या मतमोजणीत अनेक मतदार संघात सुयोग्य उमेदवाराअभावी मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारून मतदानाचे कर्तव्य बजावल्याचे समोर आले आहे. एकूण सात लाख ४३ हजार ७२० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला असून सर्वाधिक २७ हजार ५०० मते लातूर ग्रामीण मतदार संघात पडली आहेत. त्या खालोखाल  पलूस-कडेगाव येथे मतदार संघात २० हजार ६३१ मते नोटावर पडली असून, पनवेलमध्येही १२ हजार ३९९ मतदारांनी नोटाला पसंदी दिली आहे. तर सर्वात कमी नोटाला मते नेवासामध्ये ३१६ आणि येवलामध्ये३२६ मते पडली आहेत.

नाशिकमध्ये २१ हजार ‘नोटा’

’ नाशिक जिल्ह्य़ातील १५ मतदार संघांत नोटा (यापैकी कुणीही नाही) या पर्यायास तब्बल २० हजार ८२३ मतदारांनी पसंती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटनांसह काही संस्थांनी नोटांचा वापर करू नये, असे आवाहन केले होते. काही शैक्षणिक संस्थांनी पथनाटय़ाद्वारे जनजागृती देखील केली होती. नोटाऐवजी योग्य उमेदवाराचा पर्याय निवडण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नोटाने सिन्नर मतदार संघाच्या निकालास कलाटणी दिल्याचे दिसते.

’ विधानसभा निवडणुकीच्या निकालात शहरी आणि ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात नोटाचा वापर झाला. नाशिक पूर्वमध्ये नोटाला सर्वाधिक ३०९०, तर येवल्यात सर्वात कमी १०२७ पसंती मिळाली. सिन्नर वगळता इतर मतदारसंघात नोटाचा वापर निकालावर परिणाम करणारा ठरला नाही. सिन्नरमध्ये काँग्रेसच्या कोकाटे यांना ९६६४४ तर सेनेचे राजाभाऊ वाजे यांना ९४३१७ मते मिळाली. २०७२ मतांच्या फरकाने ही जागा राष्ट्रवादीला मिळाली. या फरकाइतकीच मते नोटाला मिळाली. ती मते कोणत्याही उमेदवारांच्या पारडय़ात गेली असती तर निकालाचे चित्र बदलले असते, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

पुण्यात ५१ हजार ‘नोटा’चा वापर

पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा अशा एकूण २१ विधानसभा मतदार संघांत मिळून तब्बल ५१ हजार २०८ मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) स्वीकारला. पुणे शहरात कोथरूडमध्ये सर्वाधिक चार हजार २८ मतदारांनी आणि चिंचवडमध्ये सर्वाधिक पाच हजार ८७४ मतदारांनी नोटाचा वापर केला. विशेष म्हणजे सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदारांनी नकाराधिकाराचा मोठय़ा प्रमाणात वापर केल्याचेही दिसून आले आहे.

’ शहरातील आठ विधानसभा मतदार संघांमध्ये सर्वपक्षीय आणि अपक्ष अशा एकूण १०६ उमेदवारांपैकी कोणालाही योग्य न समजता तब्बल २३ हजार ४५८ पुणेकरांनी नकाराधिकार हा पर्याय निवडला.

’ कोथरूड मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बाहेरचा उमेदवार नको असा जोरदार प्रचार करण्यात आला होता. या मतदार संघातून पाटील निवडून आले असले, तरी भाजपचे मताधिक्य मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ३९ हजारांनी घटले आहे. या मतदार संघात गेल्या निवडणुकीत १,५८३ जणांनी नोटा वापरला होता. या निवडणुकीत ४,०२८ जणांनी नोटाचा वापर केला आहे.

’ पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडमध्ये पाच हजार ८७४, पिंपरीमध्ये तीन हजार २४६ आणि भोसरीमध्ये तीन हजार ६३६ अशा एकूण १२ हजार ७५६ मतदारांनी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील ४१ उमेदवारांपैकी कोणालाही मत न देता नकाराधिकार स्वीकारला.

’ ग्रामीण भागातील दहा मतदार संघात ९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी जुन्नर मतदार संघात एक हजार ४९२, आंबेगावमध्ये एक हजार ६१६, खेड आळंदी एक हजार ७०७, शिरूरमध्ये एक हजार ८२७, दौंडमध्ये ९१७, इंदापुरात ७३१, बारामतीमध्ये एक हजार ५७९, पुरंदरमध्ये एक हजार ८०८, भोरमध्ये एक हजार ८२७ आणि मावळात एक हजार ४९० अशा एकूण १४ हजार ९९४ मतदारांनी नकाराधिकाराचा पर्याय स्वीकारला.

’ पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा अशा एकूण २१ विधानसभा मतदार संघात तब्बल ५१ हजार २०८ मतदारांनी नकाराधिकार स्वीकारला आहे.

पुण्यातील नकाराधिकाराचा वापर

मतदार संघ       २०१४         २०१९

वडगावशेरी        १,७५४         २,४१७

शिवाजीनगर      १,८४२          २,३९०

कोथरूड              १,५८३         ४,०२८

खडकवासला      २,१०८          ३,५६१

पर्वती                 १,७७४          ३,६६८

हडपसर              १,६१०         २,४७४

पुणे कॅन्टोन्मेंट   १,८१८        २,३८८

कसबा पेठ          १,३७१        २,५३२

एकूण               १३,८६०         २३,४५८