जम्मू काश्मीरमधील कलम ३७० वरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले. “आजच्या पाकव्याप्त काश्मीरला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. १९४७ मध्ये जम्मू काश्मीरात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याशी भारतीय लष्कर लढत होते. पण, ऐनवेळी नेहरूंनी युद्धविरामाचा निर्णय घेतला आणि पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला,” असा आरोप शाह यांनी काँग्रेसवर केला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरातील कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याल विरोध केला आहे. तसेच काश्मीरातील परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांच्या आरोपाला शाह यांनी उत्तर दिले. शाह म्हणाले, “राहुल गांधीजी तुम्ही आता राजकारणात आले आहात. पण, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासाठी  भाजपाच्या तीन पिढ्यांनी बलिदान दिले आहे. भाजपासाठी हा राजकीय मुद्दा नाही, तर अखंड भारताचा संकल्प आहे,” असं सांगत शाह म्हणाले, “जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याची मागणी केली. त्याचा विरोध करण्यासाठी मुखर्जी काश्मीरात गेले. तिथे त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर तुरूंगात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हे काश्मीरसाठी केलेले पहिले बलिदान होते.”

कलम ३७० आणि ३५ ए हे भारत आणि काश्मीरमधील अडथळा होते. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद मला म्हणाले, काश्मीर भारताचे अंग आहे मग कलम ३७० हटविल्याने काय होणार. सगळे तसेच म्हणत होते. महाराष्ट्र, गुजरात केरळबाबत बोलताना हे बोललं जात नाही. पण काश्मीरविषयीच म्हटले जात होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० आणि ३५ए रद्द केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे शाह म्हणाले.

“स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ६३० संस्थानांना भारतात आणण्याचे काम केले. फक्त एकट्या जम्मू काश्मीरचा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे होता. पण, सोडता आला नाही. काश्मीर भारतात विलीन झाले नाही. १९४७मध्ये अचानक पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यानंतर भारताच्या लष्कराने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. लढत भारतीय लष्कर पुढे जात होते. पण, चुकीच्या वेळी अचानक नेहरूंनी युद्धविराम केला आणि पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला,” असे शाह यांनी काँग्रेसला सुनावले.