राज्यामधील राजकीय घडामोडींना मागील काही दिवसांपासून नाट्यमय वळण मिळाल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी अचानक झालेल्या या शपथविधीनंतर राज्यात मोठा राजकीय भुकंप झाला. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार केला जाईल या भितीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना फुटू नये म्हणून काळजी घेतली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या काळामध्ये अनेक बैठकी पार पडल्या आहेत. पक्षांच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक बडे नेते त्यांची वारंवार भेट घेताना दिसत आहे. अशाच एका भेटीदरम्यान घडलेल्या प्रकारावरुन भाजपाच्या आयटी सेलच्या आशिष मेरखेड यांनी राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पवार एका हॉटेलच्या लॉबीमधून सुरक्षारक्षकांच्या गराड्यामध्ये जाताना दिसत आहे. यावेळी आव्हाड पवारांच्या पुढे चालताना दिसत आहे. अचानक पवार आव्हाडांच्या खांद्यावर थाप मारुन त्यांना मागून चालण्याची सूचना करताना या व्हिडिओत दिसतात. हाच व्हिडिओ मेरखेड यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी “शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मर्यादेत राहा आणि मागे हो. असंच सांगितलं असेल ना?” असा खोचक टोला लगावला आहे. तसेच आपल्या फॉलोअर्सला “पवार हे बोलले नसतील तर काय बोलले असतील हे कमेंट करुन सांगा,” असंही म्हटलं आहे.

या ट्विटला हजारोच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करुन पवार आव्हाडांना काय बोलले असतील याबद्दलची कमेंट केली आहे.