आपल्यावर अन्याय होतो आहे हे उदयनराजेंना आधी कळलं नाही का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “आपल्यावर अन्याय होतो आहे हे उदयनराजेंना आधी कळलं नाही का? त्यांना समज यायला १५ वर्षे लागली” असेही शरद पवार यांनी खोचकपणे म्हटले आहे. नाशिकमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर टीका केली. दरम्यान शरद पवार नाशिकमध्ये आणि छगन भुजबळ मुंबईत होते त्यावरही काही उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र त्यावर प्रश्न विचारला असता, “आजचा कार्यक्रम छगन भुजबळ यांनीच आखून दिला” असे उत्तर शरद पवार यांनी दिले.

“येत्या आठवड्यात निवडणूक जाहीर होईल, दिवाळीच्या आत राज्यात निवडणूक होईल” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस १२५, राष्ट्रवादी काँग्रेस १२५ जागांवर लढणार आहे तसंच मित्र पक्षांना ३८ जागा देण्यात येणार आहेत. हा फॉर्म्युला ठरल्याचंही त्यांनी सांगितलं.

रविवारी नवी मुंबईतही शरद पवार यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला होता. “महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. त्यांनी मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करुन रयतेचं राज्य निर्माण केलं. कुणाच्याही जाण्यानं महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू ” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता आज नाशिकमध्ये पुन्हा एकदा शरद पवार यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांना समज यायला १५ वर्षे लागली असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.