राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यातील हडपसर येथील प्रचारसभेद्वारे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मी काय केले? हे तुम्ही मला विचारण्याची आवश्यकता नाही, त्यापेक्षा सत्ता तुमच्या हातात असताना, तुम्ही पाच वर्षात काय कामं केली? हे जनतेला सांगा, असे पवारांनी यावेळी म्हटले. तसेच, माझं नाव घेतल्याशिवाय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांची भाषणं देखील पूर्ण होत नसल्याचाही त्यांनी यावेळी टोला लगावला.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रभारी शहर अध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचार सभांमधून शरद पवार यांनी राज्यासाठी काय केले आहे? असे सतत विचारत आहेत. मात्र, राज्याच्या जनतेला माहिती आहे की, मी काय केले आहे. याचा तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही पाच वर्षात काय कामं केली? हे जनतेला सांगा. मी देशाचा कृषीमंत्री असताना, गहु, तांदूळ आणि ऊस उत्पादन कसे वाढवता येईल. यावर भर देण्याचे काम केले आहे, नवनवीन उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी चालना देण्याचे काम केले आहे, कृषिमंत्री पदाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र, हे भाजप सरकार आल्यापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरुणाच्या हाताच रोजगार गेला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने पाच वर्षात काय कामं केली आहेत? हे एका तरी भाजपाच्या नेत्याने सांगावे, असे त्यांनी यावेळी आव्हान केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका बाजूला यंदाच्या निवडणुकीत आमच्या समोर उमेदवार नाही, असे सांगत आहेत. मग दुसरीकडे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा कानाकोपर्‍यात का घेतल्या जात आहेत? असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, या प्रचार सभांमुळे एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे या सरकारला मागील पाच वर्षात सर्व सामान्य जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच आता पुन्हा सत्ता येणे शक्य नाही असे दिसत असल्याने भाजपाकडून एवढ्या सभांचा सपाटा लावला जात आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

माझ नाव घेतल्याशिवाय पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांची भाषणं पूर्ण होत नाहीत : शरद पवार
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे कार्यक्रम किंवा सभेसाठी आल्यावर भाषणा दरम्यान माझ नाव आवर्जुन घेतात. माझ नाव घेतल्या शिवाय त्यांची भाषणंच पूर्ण होत नाही आणि त्यांना जमतही नाही. पण एवढा वेळ नाव घेतात, हे पाहून झोपत देखील माझे नाव घेत असतील असं मला वाटतं. या दोघांपैकी नरेंद्र मोदी हे एकटे आहेत. तर अमित शाह कुटुंबाबरोबर राहतात, जर त्यांनी झोपत माझं नाव घेतले तर काय होईल? असं शरद पवार यांनी म्हणताच म्हणताच उपस्थितमध्ये एकच हशा पिकला होता.