News Flash

शरद पवार आमचे अमिताभ बच्चन: जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शरद पवारांवर स्तुतीसुमनं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात केले आहे. जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याबाबत हे उद्गगार काढले. “शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत. वयाची ७५ वर्षे उलटून गेल्यावरही ते ज्या उत्साहाने काम करत आहेत त्याची सगळ्याच तरुणाईला भुरळ पडली आहे. ३५ वर्षांपासून शरद पवार यांच्यावर टीका केली जाते आहे. आधी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे शरद पवारांवर टीका करत असत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे टीका करत आहेत. याचाच अर्थ हा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आजही शरद पवार आहेत” असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

“शरद पवार यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा तिरस्कार करा तुम्ही त्यांना टाळू शकत नाही.” या आशयाचा एक डायलॉगही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटला. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानची साखर चालते, कांदा चालतो, नवाज शरीफला दिलेली अचानक भेट, बिर्याणी सगळं चालतं. फक्त इथे येऊन पाकिस्तानवर टीका करायची. निवडणूक जर महाराष्ट्राची आहे तर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद झालेले एक लाखापेक्षा जास्त कारखाने या सगळ्या विषयांवर मोदी का बोलत नाहीत? ” असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला. इतकंच नाही तर राज्यातल्या एकाही प्रश्नावर मोदींनी काहीही भाष्य केले नाही. सांगली, कोल्हापूर या ठिकाणी एवढा मोठा महापूर आला त्याचा साधा उल्लेखही मोदींच्या भाषणात नव्हता. त्यामुळे निवडणूक जिंकणे हा एकच उद्देश भाजपाचा आहे हेच दिसून येते” असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

याचवेळी पत्रकारांनी शिवसेना आणि भाजपाबाबत प्रश्न विचारला असता शिवसेनेला १०० जागा दिल्या तरीही ते युती करतील अन्य़था पक्ष फुटेल अशी भीती त्यांना आहे अशीही बोचरी टीका आव्हाड यांनी केली. शरद पवारांइतके अजित पवार चर्चेत नाहीत असं विचारलं असता, ” शरद पवार आमचे अमिताभ बच्चन आहेत, मात्र आमचा पक्ष म्हणजे काही मल्टिस्टारर सिनेमा नाही” असेही मिश्कील उत्तर त्यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 2:25 pm

Web Title: sharad pawar is like amitabh for us says jitendra awhad in pune scj 81
Next Stories
1 पुण्यात रिक्षावाल्यानं इंजिनिअरला गंडवलं, १८ किमीसाठी उकळलं ४३०० रूपये
2 राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र- पुणे जिल्ह्य़ात युतीचे प्राबल्य
3 रहिवासी भागात फटाके विक्री नाही
Just Now!
X