आज निवडणूक समोर आहे, मात्र आमच्या समोर विरोधकच नाहीत. लहान मुलाला विचारलं तर तोही सांगतो की महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, माती लावून तयार आहेत आखाड्यात उतरले आहेत. मात्र प्रतिस्पर्धी पक्षाचे पैलवान आखाड्यात उतरायलाच तयार नाहीत. राहुल गांधींना ठाऊक आहे की निवडणूक काँग्रेस हरणार आहे त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. तर शरद पवारांची अवस्था शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ असं शरद पवार म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फलटण या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घणाघाती टीका केली.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले आता आम्ही फार थकलो आहोत, आमच्याच्याने आता काहीही होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आपण करु. सुशीलकुमार शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार आहे ते समजलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी होणार की विरोधी पक्ष नेताही त्यांना निवडता येणार नाही. कारण विरोधी पक्ष नेता निवडायचा असेल तर १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतात. पण तेवढ्याही जागा मिळणार नाही ही खात्री पटल्यानेच सुशीलकुमार शिंदे विलिनीकरणाची भाषा करत आहेत असाही टोला फडणवीस यांनी लगावला. १५ वर्षे आघाडीची सत्ता होती, मात्र आघाडी सरकारने लोकांसाठी काहीही कामं केली नाहीत. २०१४ मध्ये देशात आणि राज्यात असं परिवर्तनाचं वादळ आलं ज्यामुळे विरोधकांची धूळधाण उडाली असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आपल्या भाषणात रणजितसिंह मोहिते पाटील यांचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. खासदार झाल्यापासून अवघ्या सहा महिन्यात फलटणकरांचं बारामतीकरांनी पळवलेलं पाणी परत आणण्यात मोहिते पाटील यांचा मोठा सहभाग होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फलटणचा सर्वतोपरी विकास करण्याची जबाबदारी आमची आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जसा खासदार निवडून दिलात तसा आमदारही निवडून द्या असंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.