शरद पवार यांचा क्षीरसागरांना टोला

जुनी पिढी शब्दाला जागणारी होती, बीड मला माझे घर वाटायचे. १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील मतदारांनी माझे सर्व उमेदवार विजयी केले होते. बीडकर इतिहास निर्माण करतात, त्यामुळे या निवडणुकीतही इतिहासाची पुनरावृत्ती करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. घरोबा एकदाच करायचा असतो. सारखे घर आणि कुंकू बदलायचे नसते, या वयात कुंकू बदलणाऱ्यांना धडा शिकवा, असा टोला त्यांनी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.

बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बुधवारी दुपारी ते जाहीर सभेत बोलत होते.

येथील जनतेनेच संदीप क्षीरसागर यांना आमदार करण्याचे ठरवले आहे. तरुण, तडफदार नेतृत्व म्हणून संदीप स्व. केशरबाई क्षीरसागर यांचा वारसा जपतोय. बीडच्या राजकारणात अनेकांना जवळून पाहिले. जुनी पिढी शब्दाला जागणारी होती, बीड माझे घर वाटायचे. १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यतील जनतेने माझे सर्व उमेदवार विजयी करून इतिहास निर्माण केला होता. त्याचीच पुनरावृत्ती करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. राज्यातील जनतेने आमचा सन्मान केला. आता नवीन नेतृत्व तयार करण्याची जबाबदारी आमची असून त्याला बीडमधून पाठिंबा मिळतो आहे. अनेकांना आम्ही शक्ती दिली, सत्तेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत व्हायला हवा होता. स्व. केशरबाई क्षीरसागर असेपर्यंत होत होते. त्यांनी विचारांची साथ कधीच सोडली नाही. त्यांना मिळाले नाही ते दुसऱ्या पिढीला दिले. तीन वेळा मंत्री होऊनही तुम्ही गुदमरताय, नवा घरोबा करत आहेत. सारखे कुंकू बदलायचे नसते, या वयात कुंकू बदलणाऱ्यांना जागा दाखवा, असा टोलाही पवारांनी जयदत्त क्षीरसागरांना नाव न घेता लगावला.

संदीप क्षीरसागर म्हणाले, गेल्या चार-पाच महिन्यांपासून प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन प्रचार केला आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एका हॉटेलमध्ये बसून पसे वाटले जात असल्याचा आरोप करत सावध रहा, असे आवाहन त्यांनी केले. २० नगरसेवक, सात पंचायत समिती सदस्य आणि चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आहेत. आम्ही जनतेच्या पशांचे राखणदार आहोत. त्यामुळे आम्हाला साथ द्या, असेही त्यांनी सांगितले. शहरातील भुयारी गटार योजनेचे काम फसवे आहे, असा आरोप करत दोन महिन्यांत तुम्ही मंत्री झालेच कसे, असा सवालही त्यांनी जयदत्त क्षीरसागरांना नाव न घेता विचारला.  यावेळी सय्यद सलीम, उषा दराडे यांची भाषणे झाली. या जाहीरसभेत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

एका पत्र्याच्या घरात स्व. केशरबाई क्षीरसागर आणि कुटुंब राहत होते, हे लहान असताना मी पाहिले. शरद पवार यांनी साथ दिल्याने इतके मोठे साम्राज्य तुम्ही त्यांच्या जीवावर निर्माण केले. तरीही तुम्ही म्हणता राष्ट्रवादीत जीव घुटमळत होता. आता एवढे देऊनही शरद पवारांनी बारामती त्यांच्या नावावर करायची होती का, असा प्रश्न संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला.