महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आणि निकालानंतर आजपर्यंत घडलेल्या घडामोडी याकडे पाहिलं तर शरद पवार हे पुन्हा एकदा राजकारणातले सरस आणि कुशल खेळाडू ठरले आहेत यात काहीही शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांनी समोर पैलवानच दिसत नाही असा प्रचार सुरु केला. ही टीका शरद पवार यांना इतकी झोंबली की त्यांनी त्यानंतर पुढच्या सगळ्या भाषणांमध्ये समोर पैलवान दिसत नाही या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. एवढंच नाही तर निकालानंतर भाजपाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घासही हिरावून घेतला.

शरद पवार यांनी काय केलं?

शरद पवार हे राजकारणात भाकरी फिरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भाकरी फिरवण्याचा अर्थ हवा तसा बदल करणं. भाजापा आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र होते. महायुती म्हणून निवडणूक लढले होते. त्यांच्या विरोधात दंड थोपटून शरद पवार निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यांच्याविरोधात प्रचार केला. त्याचा परिणाम असा झाला की निकाल जेव्हा लागले तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीने चक्क ९८ जागा मिळवल्या. या यशामध्ये शरद पवार यांचा सगळ्यात मोठा वाटा होता. कारण महाराष्ट्रात विरोधकच नाही हे म्हणणाऱ्या भाजपाचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि विरोधकांना चेहरा मिळवून दिला. त्यांनी साताऱ्यात पावसात भिजून केलेलं भाषण हे निवडणुकीसाठी निर्णायक ठरलं. त्याचाच परिणाम आपण हरणारच अशी अपेक्षा असलेल्या काँग्रेसला ४४ जागी विजय मिळाला. तर राष्ट्रवादीने ५४ जागी विजय मिळवला.

निकालानंतर महायुतीला कौल मिळाला होता. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी हे स्पष्ट केले की आता भाजपाचे काहीही ऐकून घेतले जाणार नाही. आमचे ठरले आहे तेच आम्हाला हवं. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ही शिवसेनेची प्रमुख मागणी होती. जी भाजपाने धुडकावली. शिवसेना मात्र या मागणीवर ठाम राहिली. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे महायुतीत निर्माण झालेली दरी शरद पवारांनी अचूक हेरली. त्यानंतर शिवसेना सोबत येते आहे हे म्हटल्यावर काँग्रेससोबतही एकत्र येऊन तीन पक्षांचं सरकार देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. या सगळ्यामध्ये सत्तास्थापनेची वेळही जवळ येत होत होती. भाजपाने सुरुवातीला सत्ता स्थापनेसाठी असहमती दर्शवली आणि त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. तरीही शरद पवार डमगले नाहीत. त्यांनी तीन पक्षांचं सरकार आणण्यासाठी आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरुच ठेवले.

यानंतर शिवसेनेला केंद्रातून आणि पर्यायाने एनडीएनतून बाहेर पडली. युती तुटल्याचं महाराष्ट्रात कुणीही जाहीर केलं नसलं तरीही ती तुटली हे सांगायला कोणाही तज्ज्ञाची गरज उरली नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सगळं ठरलं तरीही काँग्रेस सोबत आल्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही हेदेखील पवारांना माहित होतं. मग त्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तापेच समजावून सांगितला. बैठका, चर्चा यांची अक्षरशः गुऱ्हाळं झाल्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यांच्या बैठकाही झाल्या. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपद स्वीकारतील हे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितलं. शरद पवार यांनी मागच्या शुक्रवारी हे जाहीर केलं. २२ नोव्हेंबरला रात्री हे सगळं ठरल्यानंतर २३ नोव्हेंबरची सकाळ सगळ्यांनाच धक्का देणारी ठरली.

महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरला राजकीय भूकंप झाला कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र यामागे आपला काहीही हात नाही हे अजित पवारांचं व्यक्तीगत मत आहे असं शरद पवार यांनी सांगितलं. एवढंच नाही तर अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदारही सोबत आणण्यात यश मिळवलं. रविवार संध्याकाळपर्यंत अजित पवार स्वतः आणि आणखी दोन आमदार वगळले तर ५१ आमदारांचं संख्याबळ दाखवून दिलं. तसंच शिवसेनेच्या सोबतच जायचं ठरलं आहे असं सांगत अजित पवार यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदावरुन हकालपट्टीही केली.

हे सगळं झाल्यानंतर अजित पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. व्यक्तीगत कारणामुळे राजीनामा देतो आहे हे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवारांचं बंड शमवण्यात शरद पवार यशस्वी झाले. एवढंच नाही तर दिल्लीत गेल्यावर सोनियांशी चर्चा, मोदींशी चर्चा या सगळ्या गोष्टी घडवून अख्खा महिनाभर चर्चेतही राहिले. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने मीदेखील राजीनामा देतो आहे असं फडणवीस यांनी जाहीर केलं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवलाही. आता शरद पवार यांच्या निवडणुकीच्या आधीच्या आणि निकालानंतरच्या लढ्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर रहावं लागलं. भाजपाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास त्यांनी शरद पवार यांनी त्यांच्या खास डावपेचांनी हिरावून घेतला. त्यामुळे शरद पवार यांचं राजकीय महत्त्व  पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे यात शंका नाही.