धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंवर महिला आयोगाने ज्या पद्धतीने कारवाईचे संकेत दिले, त्यावर पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पवार म्हणाले, “धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख बहिणाबाई असा केला. या शब्दामध्ये काही चुकीचे आहे, असं मला वाटत नाही. मात्र, या भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर लगेचच याची नोंद घेऊन महिला आयोगानं धनंजय मुंडेंवर कारवाईचे संकेत दिले, ते ही मतदान तोंडावर असताना. महिला आयोगाचा हा पक्षपातीपणा आहे.”

“महिला आयोग हा कुठल्याही पक्षाचा नाही ही स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, या आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपाचा माणूस बसल्याने ते निष्पक्षपातीपणे निर्णय घेताना दिसत नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या क्लीपबाबत महिला आयोगाने काळजीपूर्वक पावलं उचलण्याची गरज होती मात्र तसं झालेलं दिसत नाही,” असा आरोपही यावेळी शरद पवार यांनी महिला आयोगावर केला.

सरकारच्या विश्वासाला गेलाय तडा

गेले पाच वर्षे हे राज्य भाजपा-शिवसेनेच्या हातात होतं. मात्र, त्यांच्या विश्वासाला आता तडा गेला आहे. शेती, शेतकऱ्याचे प्रश्न, औद्योगिक क्षेत्रात राज्याचा घसरलेला क्रमांक, ५० टक्क्यांच्या आसपास कारखानदारी आणि कमी झालेल्या नोकऱ्या यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन करण्याची लोकांची इच्छा आहे. नवी पिढीही यासाठी अनुकूल असून मला त्यांचा सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. यावरुन राजकारणात जनरेशन गॅप नाही हे तरुणांच्या प्रतिसादावरुन दिसून आलं. महाराष्ट्रातल्या सर्वच भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.