भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं,” असा सवाल उपस्थित केला होता. शाह यांच्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर प्रतित्युत्तर दिले. विशेष म्हणजे किल्लारीचा भूकंप आणि राज्यकर्त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देत पवारांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेची सभा झाली होती. या सभेत बोलताना केंद्रीय गृहंमंत्री आणि भाजपाध्यक्ष राष्ट्रीय अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं” अशी टीका केली होती. यापूर्वी अमित शाह यांच्या टीकेला पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच अमित शाह यांच्या प्रश्नाची दखल घेतली. एका सभेत बोलताना पवार म्हणाले, “जे राजकर्ते जनतेला मदत करू शकत नाही. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. कोल्हापुरात पुराचे संकट उद्भभवले. तिथे गावा-गावांत जाण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवाई सफर करून आले. लातूरला भूकंप झाला, त्यादिवशी गणेश विसर्जन होते. पहाटे ४ वाजता खिडकीचे तावदाने वाजली. मला शंका आली, हा भूकंप तर नसेल? मी कोयनेतील भूकंपमापन केंद्रावर संपर्क केला. किल्लारीत भूकंप झाल्याचे कळले. क्षणाचाही विलंब न लावता लातूर निघालो. पहाटे ६ वाजता मुंबई विमानतळावर होतो. सव्वासात वाजता किल्लारीत पोहचलो. परिस्थती भयंकर होती. १५ दिवस थळ ठोकून थांबलो. ही राज्यकर्त्याची जबाबदारी आहे. अन् आता सत्ताधारी मला विचारतात, शरद पवारांनी काय केलं?,” अशा शब्दांत पवार यांनी अमित शाह यांच्या प्रश्नाचा समाचार घेतला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, “मुख्यमंत्री पाच वर्षात काय केलं हे सांगायला जातात. काय केलं हे पाच मिनिटांत सांगतात नंतर सगळ भाषण माझ्यावर करतात. मी चौदावेळ निवडून आलो. आता या निवडणुकीत रस नाही. पण, हा महाराष्ट्र कर्तृत्वान तरुण पिढीच्या हातात द्यायचा आहे. दुसरीकडे सत्ताधारी नुसते शरद पवार… शरद पवार करतात अगदी झोपेतसुद्धा,” असा टोला पवारांनी लगावला.