माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सातारा शहरातून रॅली काढल्यानंतर झालेल्या सभेत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना स्वाभिमानावरून पुन्हा डिवचले. “पुढच्या २१ तारखेला मतदान आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा,” असं आवाहन कार्यकर्त्यांना करत उदयनराजेंना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पवार रविवारी साताऱ्यात होते. शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपात दाखल झालेल्या उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

रॅलीनंतर आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शरसंधान केलं. पवार म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?,” असं म्हणत उदयनराजे यांनी टोला लगावला.

उदयनराजे यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, “मला जयंतराव सांगत होते, मी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. पण मी त्यांचा सल्ला ऐकला नाही. कारण त्या गादीबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्र धर्म ज्या गादीने शिकवला ती ही गादी आहे. यशवंतराव चव्हाण आणि क्रांतीसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे कामाला लागा. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासह लोकसभा जिंका आणि मला गुलाल उधळायला बोलवा,” असं आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.

…तर अठरा तास काम करेल-

वयावरून बोलणाऱ्यांचा पवारांनी समाचार घेतला. “काही लोक मला वयस्कर झालो म्हणतात. मी त्यांना विचारतो काय बघितलं तुम्ही. मी नाशिकपासून ते हिंगोलीपर्यंत फिरून आलोय. गरज पडली तर सोळा नाही अठरा तास काम करेल. पण हा महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही,” असं पवार म्हणाले.