X
X

भर पावसात शरद पवारांचं भाषण, उत्साह पाहून भारावले कार्यकर्ते !

READ IN APP

शरद पवार यांचा पावसात भाषण करताना व्हिडीओ व्हायरल

सातारा या ठिकाणी शरद पवार जेव्हा सभा घेत होते त्याचवेळी पाऊस पडू लागला. मात्र शरद पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचं संबोधन सुरु ठेवलं. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले. सातारा या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. ते बोलत असताना पाऊस आला. मात्र शरद पवार यांनी न थांबता भाषण सुरु ठेवलं. त्यांच्या या कृतीमुळे सभेला उपस्थित असलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या उत्साहासाठी आणि उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या ७९ व्या वर्षीही ते ज्याप्रकारे प्रचार करत आहेत त्याबद्दल अनेकदा कार्यकर्तेही आश्चर्य व्यक्त करतात. आज तर सातारा या ठिकाणी भर पावसात शरद पवार बोलत राहिले. भर पावसात त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

आपल्या हातून काही चूक झाली तर ती मान्य करायची असते, लोकसभेच्या वेळी मी चूक केली हे मान्य करतो. मला आनंद हा आहे की ही चूक दुरुस्त करण्यासाठी सातारकर २१ तारखेची वाट बघत आहेत. श्रीनिवास पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करतील हा मला विश्वास वाटतो असंही पवार म्हणाले. तुम्ही आता श्रीनिवास पाटील यांना निवडून द्या असंही आवाहन शरद पवार यांनी केलं. इतकंच नाही तर आपल्या स्वागतासाठी पाऊस पडू लागला आहे. २१ तारखेला परिवर्तन नक्की घडेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी साक्षात वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्हा चमत्कार घडवेल असा विश्वास मला वाटतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते, एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी दिसतच नाही, भाजपावाल्यांच्या तोंडी कुस्ती, पैलवान हे शब्द शोभतच नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे पैलवानच निवडून येतील असा विश्वासही त्यांंनी व्यक्त केला.

21
X