महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटत नाहीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार येणार का? हा प्रश्न ही कायम आहे. हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात अशी चिन्हं आहेत. अशात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापनेसाठी वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान चर्चेदरम्यान शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. विदर्भाचा दौरा करुन शरद पवार यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यानंतर नितीन राऊत यांच्या घरी भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी १७ नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापन होणं अवघड असल्याचं म्हटलं आहे.

१७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असते. त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे संकेत दिले जात होते. मात्र शरद पवार यांनी ही शक्यता नाकारली आहे. नितीन राऊत यांच्या घरी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे हे उपस्थित होते. यावेळी १७ नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्या, अशी इच्छा लोखंडे यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली. मात्र १७ तारखेला अवघड आहे अजून भरपूर वेळ लागेल असे उत्तर शरद पवार यांनी दिलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबरला नवं सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या चर्चांना शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेबाबत सुरु आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार. तिन्ही पक्षांचे सरकार ५ वर्षे चालावे यावर आमची नजर असणारच आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.