हर्षद कशाळकर

काँग्रेसचे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार?

शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत शिवसेना-भाजपने युतीने जोरदार मोच्रेबांधणी केली आहे. याचे सकारात्मक परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहेत. त्यामुळे मतदारसंघासाठी यंदा शेकाप आणि शिवसेनेमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शेकापसमोर बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.  काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणूक िरगणात असल्याने पक्षाच्या मतविभाजनाचा फायदा कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

अलिबागमधील सात, मरुडमधील दोन तर रोहा तालुक्यातील एक जिल्हा परिषद मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. पक्षीय बलाबलाचा विचार केला तर मतदारसंघात शेकापकडे सात तर शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य आहेत. अलिबाग नगर पालिकेवर शेकापची तर मुरुड नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मतदारसंघात १ लाख ४६ हजार ८४ पुरुष तर १ लाख  ४८ हजार ५० महिला मतदारांचा अशा एकूण २ लाख ९४  हजार १३४ मतदारांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, शेकापकडून आमदार सुभाष पाटील यांना, तर काँग्रेसकडून अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांच्यासह एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांचाही समावेश आहे.

१९५२, १९६२, १९७२ आणि २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद सोडला तर अलिबाग विधानसभा मतदारसंघातून कायमच शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत. कै. दत्ता पाटील यांनी सहा वेळा, तर मीनाक्षी पाटील यांनी तीन वेळा मतदारसंघाचे शेकापकडून प्रतिनिधित्व केले आहे. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत सुभाष पाटील विजयी झाले आहेत. म्हणजेच सत्तर वर्षांच्या कालखंडात जवळपास ५० र्वष शेकापने मतदारसंघावर वर्चस्व राखले आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात शेकापच्या वर्चस्वाला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचाच प्रत्यय आला आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापचा उमेदवार निवडणूक िरगणात नसला तरी त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना पािठबा दिला होता. मतदारसंघात शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी असूनही सुनील तटकरे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते. अलिबाग मध्ये तर तटकरे यांना जेमतेम पाच हजारांचे मताधिक्य मिळाले होते. ग्रामपंचायत निवडणुकीतही याचाच प्रत्यय आला आहे. त्यामुळे मतदारसंघ राखण्यासाठी शेकापला यंदा मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

पूर्वी अलिबाग मतदारसंघात शेकाप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत होती. मात्र गेल्या पाच वर्षांत काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना-भाजप दाखल झाले. त्यामुळे मतदारसंघात शिवसेना-भाजपची ताकद वाढली आहे. तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. २०१४ च्या निवडणुकीत याचाच प्रत्यय आला आहे. त्यामुळे यावेळेसही मतदारसंघात शेकाप आणि शिवसेनेत प्रमुख लढत होणार आहे. दोन्ही पक्षात यंदा अत्यंत चुरशीची लढत अपेक्षित आहे.

विधानसभा निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी व्हावी यासाठी तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचा या आघाडीला विरोध होता. त्यामुळे मतदारसंघात शेकाप आणि काँग्रेसमध्ये मत्रीपूर्ण लढत करण्याची राजकीय खेळी दोन्ही पक्षांनी केली. काँग्रेसची पारंपरिक मते शिवसेनेकडे वळू नये यासाठी ही खेळी करण्यात आली. काँग्रेसकडून अलिबाग आणि पेणमधून तयारी नसलेला उमेदवार निवडणुकीत उतरविण्यात आले. यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. काँग्रेसमधील या बंडखोरीचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदारसंघातील प्रमुख समस्या

मतदारसंघात नादुरुस्त खारभूमी योजना, त्यामुळे नापिक झालेली साडेतीन हजार एकर शेती, २५ वर्षांपासून सांबरकुंड धरणाचे रखडलेले काम, सिंचनाआभावी शेतीचे होणारे नुकसान, अलिबाग रोहा, पेझारी नागोठणे, काल्रेखिंड हाशिवरे रस्त्याची दुरवस्था आणि करोडो रुपये खुर्चूनही नादुरुस्त असणाऱ्या सावली मांडवखारसारख्या पाणीपुरवठा योजना, कुंडलिका नदीच्या प्रदूषणामुळे रोह्यातील गावांना भेडसावणारी पाणी समस्या, उमटे धरणातून ६० गावांना होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, तिनवीरा धरणाच्या जलशुद्धीकरणाचे रखडलेले काम, जेएनएम कॉलेज इमारत, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे, मच्छिमारांचा रखडलेला डिझेल परतावा, अलिबाग वडखळ मार्गाचे चौपदरीकरण, टाटा पॉवरने प्रस्तावित प्रकल्पातून घेतलेली माघार, प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या मतदारसंघातील प्रमुख समस्या आहेत.