28 September 2020

News Flash

मतदारसंघातील निष्क्रियता अवधूत तटकरेंना नडली

रोह्यतील अनुभव लक्षात घेऊन शिवसेनेने उमेदवारी नाकारली

(संग्रहित छायाचित्र)

हर्षद कशाळकर

विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. श्रीवर्धनमधून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र ऐन वेळी सेनेकडून मुंबई म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. रोहा नगरपालिका निवडणुकीतील अनुभव आणि मतदारसंघातील निष्क्रियता लक्षात घेऊन शिवसेना नेतृत्वाने अवधूत यांना उमेदवारी देणे टाळले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रवी मुंढे यांचा ७७ मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे विजयी झाले होते. मात्र या विजयानंतर तटकरे कुटुंबातील गृहकलह विकोपाला गेला. अवधूत यांनी पक्षांतर्गत कार्यक्रमांपासून अलिप्त राहणे पसंत केले, गेल्या पाच वर्षांत ते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले नाही.

रोहा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तटकरे कुटुंबात ठिणगी पडली. राष्ट्रवादीकडून संदीप तटकरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी यासाठी अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे आग्रही होते. मात्र सुनील तटकरे यांनी आपले व्याही संतोष पोटफोडे यांना उमेदवारी दिली होती. यावेळी संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली होती निवडणुकीत संदीप तटकरे यांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीनंतर काही दिवसांतच संदीप तटकरे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अवधूत तटकरे यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला.  लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेला पक्षांतर्गत गटबाजीचाही फटका बसला होता.

शिवसेनेत प्रवेश केला असला तरी श्रीवर्धनमधून उमेदवारी मिळावी असा आग्रह मी केला नव्हता. पक्षनेतृत्वाने विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली. माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार आहे. ते निवडून यावेत यासाठी जे करणे अपेक्षित ते मी करणार आहे.

-अवधूत तटकरे, शिवसेना नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 12:51 am

Web Title: shirvardhan avdhut tatkare vinod ghosalkar abn 97
Next Stories
1 पुण्यातील धक्कादायक घटना : पत्नीला अश्लील बोलणाऱ्या मित्राची अपहरण करून हत्या
2 … सांगा आम्ही बेरोजगार तरुणांनी पोट कसं भरायचं?; रॅपच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा
3 जालना जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यु; दोन जखमी
Just Now!
X