केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, आता अवजड उद्योग मंत्रालयाचा कारभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

अरविंद सावंत यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (मंगळवारी) राष्ट्रपती रामनाथ कोंविंद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. “३० मे रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मला केंद्रात अवजड उद्योग खात्याची जबाबदारी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून मी खात्याचा कार्यभार सांभाळतो आहे. मात्र, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे,” असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं होतं.

भाजपाने विधानसभा निवडणूक निकालानंतर दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितलं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली का? असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. ज्यावर मी राजीनामा दिला आहे त्यातच सगळं आलं असं सूचक वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं.