मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते आणि १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान मतदान होईल, असे महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर युतीच्या जागावाटपाचा निर्णय आठवडाभरात लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तर युतीचे जागावाटप कधीही अगदी दोन दिवसांतही होऊ  शकते, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडणुकीच्या तयारीशी संबंधित बैठका घेतल्या.  या बैठकांत संघटनेची तयारी, सर्व २८८ मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतींचा अहवाल, संभाव्य उमेदवारांचे पर्याय आदी  विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कधीही आचारसंहिता लागू शकते, असे भाकित वर्तवले. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

त्यापूर्वी दुपारी सुभाष देसाई यांच्या दालनात चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली. मित्रपक्षांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि युतीच्या जागावाटपाबाबत यावेळी चर्चा झाली.  लवकरच युतीच्या जागावाटपावर निर्णय होईल, असे सुभाष देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

युतीचे जागावाटप कधीही जाहीर होऊ शकते. अगदी दोन दिवसांतही. मी व मुख्यमंत्री फडणवीस त्यावर अंतिम चर्चा करून निर्णय घेऊ. काही गोष्टींवर नंतरही चर्चा होत राहील, असे उद्धव ठाकरे यांनी अवधूत तटकरे यांच्या पक्षप्रवेशावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि छगन भुजबळ यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा मुद्दा अडथळा आहे का असे विचारता, तसे काही नाही, असे उत्तर ठाकरे यांनी दिले.