शिवसेना, भाजपची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळे उमेदवारीच्या प्रतीक्षेत

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या १२५ तर शिवसेनेच्या ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता, संशय आणि नाराजी पसरली. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि बाळा भेगडे या मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळू शकले नाही. मात्र, खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षनेतृत्वाला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवापर्यंत असल्याने पक्षांतर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.   भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीत शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या १२४ मतदारसंघांची यादी मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपने नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या यादीत ९२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर नऊ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपच्या यादीत पक्षाच्या कोअर समितीचे सदस्य व उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांना स्थान मिळू शकलेले नाही. याशिवाय एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता या माजी मंत्र्यांच्या उमेदवारीचा निर्णय अद्याप अनिर्णित आहे. खडसे यांनी पक्षाची यादी जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने खडसे यांना नाराजी लपविता आली नाही. आपण चार दशके पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्ष योग्य निर्णय घेईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. भाजपने उमेदवारी नाकारल्यास खडसे माघार घेणार की बंड करणार याची उत्सुकता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया उमटली आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी लपून राहिलेली नाही. कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांना पुण्याचा आधार घ्यावा लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात एकच संयुक्त उमेदवार उभा करण्याची विरोधकांची व्यूहरचना आहे.

नागपूरमध्ये भाजपने विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना कोहळे यांनी व्यक्त केली. नवी मुंबईतील बडे प्रस्थ गणेश नाईक यांना अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे नवी मुंबईत गेले होते. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी नाईक यांची मागणी होती. पण बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देऊन भाजपने नाईक यांना धक्का दिला. नाईक यांचे पुत्र संदीप यांना मात्र ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गणेश नाईक हे आता कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या १२४ मतदारसंघांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर होताच भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला. उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले भाजपमधील इच्छुक युतीचे जागावापट पाहून नाराज झाले. काही जणांनी बंडाचा पवित्रा घेतला. शिवसेनेच्या वाटय़ाला मुंबई, ठाणे आणि कोकणातील बहुसंख्य जागा आल्या आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व आहे. मुंबईतील ३६ पैकी १९ जागा शिवसेना लढविणार आहे. शिवसेनेच्या वाटय़ाला १२४ जागा आल्या असल्या तरी भाजप किती जागा लढविणार आणि मित्रपक्षांना किती जागा सोडणार याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. जागावाटपावरून शिवसेनेतही अस्वस्थता होती. पुण्यात एकही जागा वाटय़ाला न आल्याने शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर धाव घेतली. शिवसेनेने बहुसंख्य विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. शिवसेनेच्या यादीत आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह बहुतेक दिग्गजांना उमेदवारी देण्यात आली आहे.

२७ उमेदवारांची मनसेची पहिली यादी

मनसेने पहिल्या यादीत २७ उमेदवारांची घोषणा केली. त्यात संदीप देशपांडे, अविनाश जाधव आदींचा समावेश आहे. त्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा समावेश नाही. मनसे १०० पेक्षा जास्त जागा लढणार आहे. त्यामुळे या जागा कोणत्या आणि उमेदवार कोण असतील, याबाबत उत्सुकता आहे.

समाजवादी पक्ष महाआघाडीतून बाहेर

* भाजप – शिवसेनेत जागावाटप आणि उमेदवारीवरून अस्वस्थता आणि नाराजी पसरली असतानाच, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीतही बिनसले आहे.

* समाजवादी पक्षाला सात जागा सोडण्यात येणार होत्या. पण, भिवंडी आणि भायखळा या दोन जागांवर काँग्रेसने दावा करीत या जागा सोडण्यास नकार दिला.

* यामुळे स्वतंत्रपणे लढण्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी जाहीर केले.

* भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

* नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. पण बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देऊन भाजपने नाईक यांना धक्का दिला.

* शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या १२४ मतदारसंघांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर होताच भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला.

* पुण्यात एकही जागा वाटय़ाला न आल्याने शिवसैनिकांनी तीव्र नापसंती  व्यक्त केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने खडसे यांना नाराजी लपवता आली नाही. आपण चार दशके पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्ष योग्य निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्यास खडसे माघार घेणार की बंड करणार, याबाबत उत्सुकता आहे.