प्रदीप शर्मा यांचे  वादग्रस्त वक्तव्य

वसई/विरार : वेळीच वसईच्या गुंडांना गोळ्या घातल्या असत्या तर आज वसईकर जनता सुखी झाली असती, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे नालासोपारा येथील उमेदवार प्रदीप शर्मा यांनी जाहीर सभेत केले. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. शर्मा यांनी केलेल्या आजवरच्या सर्व चकमकी या खोटय़ा होत्या हेच यावरून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया आमदार ठाकूर यांनी दिली.

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी वसई विरारचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यावर प्रचारात जोरदार टीका केली आहे. रविवारी शर्मा यांची प्रचारसभा विरारच्या फुलपाडा येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. दाऊदला पाकिस्तानात पाठवले, मुंबईतील दादागिरी संपवली, त्याच वेळी जर दोन गोळ्या वसई-विरारमधील गुंडांवर झाडल्या असत्या तर येथील जनता सुखी झाली असती, असे ते म्हणाले. दादागिरी करणाऱ्यावर दादागिरी करा, असे मला आदेश होते, असेही ते भाषणात म्हणाले.

ठाकूर यांचे प्रत्युत्तर

शर्मा हे सुपारी घेऊनच चकमकी करत होते, हे यावरून सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया आमदार ठाकूर यांनी दिली. शर्मा यांनी आजवर केलेल्या सर्व चकमकींतील सत्य बाहेर काढणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रदीप शर्मा यांनी अनेकांना मारले, आपल्याच सहकाऱ्यांना अडकवले आणि कोटय़वधी रुपयांची माया गोळा केली. शर्मा यांची ही सर्व पापे त्यांना भोगायला लावणार, असेही ठाकूर यांनी सांगितले.

प्रदीप शर्मा यांच्या प्रचारात अनेक गुंड फिरत आहेत. या गुंडांकरवी ते खोटा हल्ला घडवून आणून शिवसैनिकाचीच हत्या घडवून आणण्याचा कट असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सोमवारी  पत्रकार परिषदेत केला. या खोटय़ा हल्लय़ाचा आरोप माझ्यावर करून सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली.